लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्याच्या विकासाला अधिक वेगाने पुढे घेवून जाण्यासाठी श्री.गणरायाने शक्ती द्यावी, सर्व विघ्न दूर व्हावेत अशी प्रार्थना करीत महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा उद्योग समुहाच्या गणेशाची स्थापना केली.
प्रवरा उद्योग समूहाच्या श्री.गणेशाची स्थापना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली. प्रवरा परीवारातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या मंगलमय उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात होणारे गणेशाचे आगमन हे सर्वांना नवी उर्जा देणारे असते. श्री.गणेशाला आपण सर्वजन विघ्नहर्ता मानतो. त्यामुळेच राज्यावरील सर्व विघ्न दूर होवू दे आणि राज्याच्या विकासाला अधिक वेगाने पुढे घेवून जाण्याची शक्ती दे अशी प्रार्थना आपण गणरायांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश उत्सव हा संपूर्ण समाजाला एकत्रित आणण्याचे काम करतो. सामाजिक सलोखा यामुळे निर्माण होतो. यावेळचा गणेश उत्सव अशाच सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, या उत्सवाला कोणताही राजकीय अभिनिवेश नाही, त्यामुळे समाजाची शांतता आणि एकता टिकून ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच सध्या राज्यामध्ये सामाजिक वातावरण कलुशित करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. या मंगलमय वातावरणात राज्याची सामाजिक एकता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरीकाने पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.



