कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ) :- ऋण कधी चुकत नाही. केलेली हत्या कधी लपत नाही. केलेले पाप कधी मिटत नाही. त्यासाठी ऋण कुणाचं विसरू नका. कर्ज कुणाचं बुडवू नका. म्हातारपण आल्यावर ते जात नसतं. मृत्यू कधी टळत नसतो. म्हणून पापकर्म करू नका. पुण्यकर्ण करून मरावं. जीवनात निरर्थक जगू नये असे मौलिक उद्गार गुरुवर्य महंत रामगिरीजी यांनी काढले.
कोल्हार भगवतीपूर येथे बुधवारी श्रीमद् भागवत कथेचे चतुर्थ पुष्प गुंफतांना ते बोलत होते. भगवतीदेवी मंदिराच्या भव्य प्रांगणात दररोज रात्री ७ ते १० या वेळेत श्रीमद् भागवत कथा सुरू आहे. कथा श्रवण करण्यासाठी जनसागर ओसंडून वाहू लागला आहे. बुधवारपासून गर्दीच्या उच्चांकात वृद्धी होऊ लागली. याठिकाणी उभारलेला भव्य शामियाना भाविकांच्या गर्दीने पूर्णतःभरला गेला. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.
रामगिरी महाराज म्हणाले, ज्याला आरोग्य प्राप्त करायचं त्याने सूर्याला दररोज अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य देणारा कधीही दरिद्री होत नाही. अर्घ्य देताना पाण्याची जी धार असते त्या जलधारेचा आणि सूर्यप्रकाशाचे संक्रमण होऊन त्यातून सप्तरंग निघतात. त्यातून व्हीटॅमिन मिळते. शरीराचे निर्जंतुकीकरण होते. हा वैज्ञानिक आशय सांगत जो साधूचा अपमान करतो तो दरिद्री होतो. त्याची सत्ता निघून जाते असेही त्यांनी सांगितले.
ध्रुवाच्या भक्तीचे वर्णन करताना महाराज म्हणाले, उत्तमपाद म्हणजे जीव होय. त्याला सुरुची ( आवडती ) आणि सुनीती ( नावडती ) या दोन पत्न्या होत्या. एक दिवस सुनीतीचा पुत्र ध्रुव उत्तमपादाच्या मांडीवर बसायला गेला असता त्याने आणि सावत्र आई सुरुचीने ध्रुवाला ढकलून दिले. ध्रुवाने ही गोष्ट आईला सांगितली, त्यावेळी ती म्हणाली, ध्रुवा तू अशा जागेवर बस जेथून कोणीही तुला उठविणार नाही. जंगलात जा आणि भगवंताची तपस्या कर. तो तपस्येसाठी वनात गेला. तेथे त्याला नारद भेटले. ध्रुवाने त्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर नारद म्हणाले, गुणाने आपल्यापेक्षा अधिक असेल त्याला वंदन करावे. गुणाने कमी असेल त्याच्यावर दया करावी. गुणांनी समान असेल त्याच्याशी मैत्री करावी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, असे सांगून नारदाने ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपायला सांगितला. ध्रुवाने अन्न व जलत्याग करीत तपस्या केली. त्यानंतर भगवान परमात्मा प्रकट झाले.
ज्ञानी परमहंस ( वृषभदेव ) यांची कथा सांगताना रामगिरी महाराज म्हणाले, वृषभदेवाला शंभर पुत्र होते. त्यातील ८१ मुलं कर्मकांडी ब्राह्मण बनले. तर नऊ मुले नवयोगेशवर बनले. हेच नवयोगेश्वर कलियुगात नवनाथ म्हणून प्रकट झाले. उर्वरित मुले भूमीला वाहून वृषभ देव वानप्रस्थ झाले. भक्ती परमहंस ( भरत ) कथा सांगताना महाराज म्हणाले, भरताचे प्रचंड राजभैभव असतानाही त्याला वैराग्य प्राप्त झाले. त्याने राज्यत्याग केला. वनात साधना करण्यासाठी तो निघून गेला. त्याला एक हरणाचं पाडस दिसले. त्याला त्याचा मोह पडला. त्याच्यामागे धावताना ठेच लागून भरत मृत पावला. पुढच्या जन्मात तो हरिण झाला. मोहाचा स्पर्श झाल्याने हे घडले. आणखी एका जन्मानंतर भरताचा ब्राह्मणकुळात जन्म झाला. तो सतत भगवत भजनात रममाण असायचा. तेथे एक भिल्ल राजा होता. नरबळी द्यायचा म्हणून भरताला भद्रकालीमातेसमोर बळी देण्यासाठी नेण्यात आले. तलवारीने त्याचा शिरच्छेद करणार तेवढ्यात भद्रकाली प्रकट झाली आणि त तिने त्या राजाचा शिरच्छेद केला. भक्ताला वाचवण्यासाठी देवी प्रकट झाली असे अनेक संदर्भ देण्यात आले.
भरत राहूगण संवादामध्ये नरकाची निर्मिती भगवंताने का केली ? याची माहिती देताना महाराजांनी उदाहरण दिले. ते म्हणाले, कपड्याला डाग पडल्यावर ते निघत नाहीत. मग धोब्याकडे धुवायला दिले जातात. तो कपड्याला भट्टीत टाकतो. पावडर वापरून घासतो. नंतर कपड्याची पिटाई करतो. नरदेहरुपी चादर भगवंताने दिली. पापे केली की त्यावर डाग पडतात. म्हणून नरकाची निर्मिती केली. नरकयातना ह्या जीवाच्या शुद्धीकरणासाठी आहे. तसेच भगवंताचे नामस्मरण ही सर्वात चांगली भक्ती आहे. पाप जाळण्याचे सामर्थ्य नामात आहे. रामनाम चिंतनाने वाल्याचा वाल्मिकी झाला. नामाबाबत अजामीलाची कथा सांगत महाराजांनी नामाचा महिमा सांगितला व भक्त प्रल्हादाची कथा वर्णन केली. याशिवाय दक्ष प्रजापतीचा प्रसंग, आठव्या स्कंधात मन्वंतर लिला, समुद्रमंथनाचे वर्णन, नवव्या स्कंधात सूर्यवंश आणि चंद्रवंशाची वंशावळ संक्षिप्तरूपात महाराजांनी सांगितली.
कथेदरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. या प्रसंगाला उपस्थित भाविकांनी भरभरून दाद दिली. कोल्हार भगवतीपूरला गोकुळाचे स्वरूप प्राप्त झाले. डोक्यावर पाटी घेतलेला वसुदेव, बाळकृष्ण, नंदराजा, माता यशोदा हे प्रसंग हुबेहूब साकारून प्रसंगाला जिवंतपणा आणला. दरम्यान दररोज संध्याकाळी येथे नवनाथ महाराज म्हस्के व भगवान महाराज डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळेश्वर येथील सद्गुरू श्री नारायणगिरीजी गुरुकुलचे विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या स्वरात पावली नृत्याने हरिपाठ म्हणत आहेत.



