नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चा अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यासाठी जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाला असत्याच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यास २४ सप्टेंबर २०२३ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान येथे सायंकाळी ५ वा. ते रात्री १० वा या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार करणार असून अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.
या संमेलनास मुख्यअतिथी म्हणून प्रसिद्ध इतिहासकार मा. म. देशमुख, हमाल पंचायत महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाबा आढाव, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून आमदार अँड. वासंती नलावडे, बहुजन क्रांती मोर्चा संयोजक विठ्ठल सातव, ज्येष्ठ लेखक तथा अभ्यासक राजश्री शाहू महाराज साहित्य प्रा. डॉ. जे. के. पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, इम्पा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाने, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ राष्ट्रीय अध्यक्षा कुंदाताई तोडकर, बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय कार्याध्यक्ष अँड. माया जमदाडे, राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हिजबुल रहिमान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात सत्यशोधक समाज स्थापने मागील उद्देश, विचारधारा व आजची प्रासंगिकता यासह सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनची पूर्वशर्त होय या विषयावर चिंतन करण्यात येणार असल्याची माहिती सदर पत्रकामध्ये देण्यात आली आहे. तरी या संमेलनासाठी बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे, जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके, जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोरुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा संघटक अनिल सोमवंशी, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, शहराध्यक्ष अमोल मोगरे आदींनी केले आहे.