टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून फिरता चषकही पटकाविला आहे.
अशोकनगर येथे भास्करराव गलांडे पाटील स्मृती वक्तृत्व स्पर्धा भास्करराव गलांडे पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लहान गटामधून कु. सुप्रिया प्रसाद कदम व श्रावणी आनंद रसाळ तर मोठ्या गटातून प्रज्वल बापूसाहेब नवले व कु. श्वेता आबासाहेब थोरात या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इयत्ता दहावी अची विद्यार्थीनी कु. श्वेता आबासाहेब थोरात हिने पटकावला आहे. ज्या विद्यालयातील चारही स्पर्धांच्या गुणांची बेरीज सर्वाधिक येते अशा विद्यालयास फिरता चषक देण्यात येतो तो फिरता चषकही न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयाने मिळविला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्वेता थोरात, प्रज्वल नवले, सुप्रिया कदम, व श्रावणी रसाळ या चारही यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्रीमती मीनाताई जगधने, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बापूसाहेब पटारे, राहुल पटारे, मंजाबापू थोरात, विद्यालयाचे प्राचार्य बी.टी.इंगळे, पर्यवेक्षक ए डी बनसोडे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी पालक ,शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच,सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, पत्रकार आदि.सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




