राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सु-व्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांना धाक व वचक बसून सर्व सामान्य नागरिकांना विश्वास निर्माण व्हावा. या उद्देशाने राहुरी तालुक्यातील उंबरे येथे व राहुरी शहरातील गणपती विसर्जन मार्गावर रॅपिड ॲक्शन फोर्स अर्थात शीघ्र कृती दलाकडून पथ संचालन करण्यात आले.
आज दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील उंबरे येथे शिघ्र कृती दल पथक अचानक पोहोचताच नागरिक भयभीत झाले. मात्र गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाचे पथकाचे पथ संचलन असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर राहुरी शहरात हे पथक पोहोचल्यानंतर गणपती विसर्जन मार्गावर वायएमसी ग्राउंड- मल्हारवाडी चौक- शनी चौक- आझाद चौक- मठ गल्ली- आझाद चौक- शनी मंदीर- शिवाजी चौक- शुक्लेश्वर चौक याप्रमाणे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी पथ संचलन केले. पथ संचलनमध्ये अहमदनगर येथील दंगल नियंत्रण पथक, राहुरी पोलीस पथक तसेच गृहरक्षक दल सहभागी झाले होते.
यावेळी शीघ्र कृती दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक अलोककुमार झा, उपविभागीय अधिकारी विशाल एरंडे तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक अर्चना कुमारी, पोलीस निरीक्षक सुशील कुमार, पोलीस उप निरीक्षक विशाल पखा व राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. या संचलनात १३ अधिकाऱ्यांसह १७० शिघ्र कृती दलाचे जवान, पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचाऱ्यांचा समावेश होता.