spot_img
spot_img

तप – शौच – दया – सत्य या चार चरणावर धर्म चालतो : महंत रामगिरी कोल्हार भगवतीपूर येथे श्रीमद् भागवत कथा श्रावणाला गर्दी वाढू लागली

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- तप – शौच – दया – सत्य या चार चरणावर धर्म चालतो. कलियुगात पहिल्या तीन चरणांचा ऱ्हास झाला. सत्य अविनाशी असल्याने फक्त तेच उरले. जेथे द्युत, मदिरा, परस्त्रीगमन, हिंसा आणि सुवर्ण आहे तेथे कलीचा वास आहे. कलीयुगात एकच चांगला गुण आहे तो म्हणजे, नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होत असल्याचे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी सांगितले.
कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात श्रीमद् भागवत कथेचे द्वितीय पुष्प गुंफताना रामगिरी महाराज बोलत होते. सायंकाळी ७ ते १० या वेळेत होत असलेल्या या कथेस भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिभव्य उभारलेला शामियाना भाविकांच्या गर्दीने व्यापला. सोमवारी रामगिरीजी महाराज यांनी
महाभारतातील युद्ध समाप्तीनंतरचा प्रसंग, कुंती आणि श्रीकृष्णाचा संवाद, भीष्माचार्यांचा अंतसमय, राजा परीक्षितीचा मोक्षप्राप्तीचा ध्यास यावर संदर्भासह वाद्यवृंदाच्या स्वरामध्ये कथा निरूपण केले.
व्यासांकडून शुक्राचार्यांनी श्रीमद् भागवत श्रवण केले. व्यासांनी त्यांना भागवताचा प्रसार करण्यास सांगितले. हे कथामृत शुक्राचार्यांनी राजा परीक्षितींना पाजले. महाभारतातील प्रसंग वर्णन करताना रामगिरी महाराज म्हणाले, अश्वत्थामाने द्रौपदीच्या मुलांना मारून टाकले. पांडवांनी अश्वत्थामाला पकडून द्रौपदी समोर आणले परंतु त्याला मारू नये असे द्रौपदीने सांगितले. मी आई आहे. मला जे दुःख झाले ते दुसऱ्या आईला होऊ नये. त्याची आई निराधार होऊ नये असे तिने पांडवांना सांगितले. यावर श्रीकृष्णाने पांडवांना गुरुपुत्राला मारू नये, मात्र त्याचा अपमान करावा हा सल्ला दिला. कारण अपमान हा शहाण्या माणसाला मृत्यूसमान असतो.
महाभारतामध्ये युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्ण भगवान निजधामाला निघाले असता कुंतीला दुःख होते. ती श्रीकृष्णाला म्हणते, तुम्ही जन्मदात्या वासुदेव – देवकीला सोडून गेले. यशोदेलाही सोडून गेले. हा तुमचा स्वभाव आहे. भक्तांना लळा लावून तुम्ही निघून जाता. परंतु मी भाग्यवान आहे, तुम्ही देवकीच्या पुत्रांना कंसापासून वाचवू शकले नाही. मात्र माझ्या पुत्रांना ( पांडवांना ) तुम्ही कौरवांपासून वाचविले. भीष्माचार्यांनी अंतसमयी श्रीकृष्णाच्या दर्शनाची अभिलाषा व्यक्त केली. श्रीकृष्ण मृत्यूशैय्येवरील भीष्माजवळ उभे राहिले. भीष्मांनी त्यांच्याचरणी बुद्धी व मन समर्पण करून प्राण सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
रामगिरी महाराज म्हणाले, दूषित विचारांच्या व्यक्तीचे अन्न सेवन करू नये. नाहीतर आपली बुद्धी दूषित होते. राजा जेव्हा प्रजेचे शोषण करू लागतो तेव्हा प्रकृती अर्थात निसर्ग देखील सुकू लागतो. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, भूकंप हे त्याचेच लक्षण होय. धर्मराजाच्या काळात प्रकृती बहरलेली होती. वाईट विचारांच्या माणसाची वस्तू देखील वापरू नये कारण त्या वस्तूवर त्याचे संस्कार झालेले असतात.
अर्जुन व उत्तराचा पुत्र राजा परीक्षितीने जरासंधाचा सुवर्णमुकुट डोक्यात परिधान केला म्हणून त्याला शिकारीची इच्छा झाली. म्हणजे तिथे हिंसा आली. परीक्षितीने रागामध्ये एका ऋषींची चेष्टा केली. ऋषी पुत्राने हे पाहिल्यावर परिक्षितीला ७ दिवसात मरण्याचा शाप दिला. हे कळाल्यानंतर ऋषीने पुत्राला समज दिली व ही गोष्ट परीक्षेतील सांगण्याचे फर्मावले. परिक्षितीला जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी केलेला चुकीचा त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी आपला पुत्र जन्मेजयकडे राज्यकारभार सुपूर्द करून वानप्रस्थ झाले. परीक्षितीने नारद, व्यास, शुक्राचार्य तसेच अनेक ऋषींना या सात दिवसात मुक्ती मिळविण्याचा मार्ग विचारला. शुक्राचार्यांनी मोक्षप्राप्तीसाठी परिक्षितीला सांगितले, अंतकाळी मृत्यूचे भय वाटू नये. कारण आत्मा कधीच मरत नाही. मुक्ती मिळविण्यासाठी आसन – श्वास – संगती – इंद्रिय या चार गोष्टींवर विजय मिळविण्याचे सांगितले. अधिक काळ आसन साधना आली पाहिजे. श्वासावर विजय मिळविला तर मनावर नियंत्रण येते. कुसंग टाळावा. इंद्रियांना स्वैर भटकू देऊ नये असेही रामगिरी महाराज यांनी सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!