राहाता दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री भृण हत्या, प्रदूषण, व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण ,शेतकरी व्यथा, स्वच्छ भारत अभियान देशभक्ती, लावणी, पोवाडा, कोळीगीत, भावगीत, गौळण अशा विविध विषयांसह शिवराज्याभिषेक अशा विविध कला गुणातून संगम साधक प्रेक्षकाची मन जिंकणाऱ्या राहाता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३ चा प्रारंभ मोठ्या दिमाखात झाला. बाहेर कोसळणाऱ्या जलधारांच्या साक्षीने विद्यार्थी कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व युवा नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहाता आयोजित राहाता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव राहाता परिसराला एक पर्वणी ठरत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल,औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अशा विविध ४५ शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवातून आपला कलाविष्कार सादर करीत आहे. आयोजकांनी वॉटरप्रूफ मंडपासह खुर्च्यांची व्यवस्था प्रेक्षकांना विराजमान होण्यासाठी केल्यामुळे मुसळधार कोसळणाऱ्या वरून राजाच्या साक्षीने प्रेक्षक कलाविष्काराचा आनंद घेत आहेत. व्यावसायिक कार्यक्रमांपेक्षाही सरस कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादरीकरण होत असल्यामुळे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या महोत्सवाला मिळत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे,त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, ग्रामीण भागातून चांगले कलाकार निर्माण व्हावेत, खेळाडू निर्माण व्हावेत, त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे समाज प्रबोधन व्हावे या हेतूने या महोत्सवाची सुरुवात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.हे महोत्सवाचे चौदावे वर्ष आहे. याप्रसंगी अँड.रघुनाथराव बोठे,सोपान काका सदाफळ, कैलास सदाफळ, संजय सदाफळ रामकृष्ण लोंढे, राजेंद्र वाबळे, सुनील सदाफळ, दशरथ तुपे, भगवान डांगे, साहेबराव निधाने, अनुप कदम यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दिवशीच शेवटी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतो. पारितोषिकांबरोबर सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो.
सांस्कृतिक व क्रीडा हे दोन्हीही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे डायरेक्टर प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख उपप्राचार्य डॉ. दादासाहेब डांगे,आयटीआय कॉलेज प्राचार्य प्रा.सुनील दंडवते, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रा.नारायण गुळवे, क्रीडा स्पर्धा समन्वयक जालिंदर गाढे व त्यांच्या टीमने व्यवस्थित नियोजन केले असून त्यासाठी ते परिश्रम घेत आहेत.
प्रवरा सास्कृतिक आणि क्रिडा महोत्सव हा विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसह राहाता येथील प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे लोकाभिमुख ठरत आहे शिवाय खास आयोजित केलेल्या लकी ड्राव्दारे विविध बक्षीसे जिंकण्याची संधी प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी होणा-या पारितोषिक वितरणामुळे मुलांचा जल्लोश ही येथे होत आहे.