कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- सत्याचा कधीही नाश होत नसतो. भूत – वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात जो अविनाशी असतो तो परमात्मा होय. सत्य हे परमेश्वराचे स्वरूप आहे. चित म्हणजे चैतन्य होय. परमात्मा चैतन्य रूपाने सर्व विश्वात सामावलेला आहे. आनंद म्हणजे योगी ज्याच्यात रममाण होतात तो आनंद होय. या तीनही शब्दांचा मिळून सच्चिदानंद शब्द बनला असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.
कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवती देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात श्रीमद् भागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफताना रामगिरी महाराज बोलत होते.
सायंकाळी ७ ते १० या वेळेत होत असलेल्या या सोहळ्याला महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली. महंत रामगिरी महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून वाहणाऱ्या भक्ती रसात अवघे भाविक मंत्रमुग्ध झाले. रविवारी श्री श्रीमद् भागवत ग्रंथारंभ करीत मंगलाचरणाचा अर्थ त्यांनी विशद केला.
या विश्वाच्या उत्पत्ती – स्थिती – लयाला कारण असणारा परमात्मा आहे. त्रिविध तापांचा नाश करतो तो परमात्मा होय. नारदांनी व्यासांना श्रीमद् भागवत कथा रचना करण्यासाठी प्रवृत्त केले. भागवताची रचना व्यासांनी केली. वेदांच्या सूत्रापासून भागवत ग्रंथाची निर्मिती झाली. एकाच परमात्म्याला अनेक पद्धतीने समाजासमोर मांडण्याचे काम व्यासांनी केले. पुराण, उपनिषदे लिहूनही समाधान झाले नाही म्हणून व्यासांनी भागवताची निर्मिती केली. शुक्राचार्य हे व्यासांचे पुत्र होते. आईच्या उदरात शुक्राचार्य बारा वर्षे होते. जन्मताच त्यांनी सर्व नात्यांचा त्याग केला असल्याचे महाराजांनी सांगितले.
नारद आणि संकुमारांचा संवाद सांगताना रामगिरी महाराज म्हणाले, कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याची किंमत कमी झाली. अनाचार वाढला. नातेसंबंधातील दरी वृद्धिंगत झाली. स्वार्थी दृष्टीकोन बळावला या शब्दात नारदाने कलियुगाची विदारक परिस्थिती संकुमारांसमोर वर्णन केली. यावर ज्या शास्त्रात हरिभक्ती नाही असे शास्त्र उपयोगी नाही. अंतकरणांमध्ये भक्ती मार्ग जागृत करण्यासाठी भागवत असल्याचे संकुमारांनी नारदांना सांगितले.
आत्मदेवाची कथा सांगताना महाराज म्हणाले, संसारात चटके बसायला लागले की कथा कीर्तन करण्याकडे कल वाढतो. म्हणून कथा कीर्तनामध्ये पन्नाशीच्या पुढचे भाविक जास्त दिसतात. संसारोपयोगी वाटत नाही तेव्हा संसारापासून अलिप्त व्हावे. भक्तीरसाचा आनंद घ्यावा. भगवंताच्या भक्तीमध्ये समाधान आहे. संतुष्टी आहे. श्रीमद्भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाची वाड्मयीन मूर्ती होय. श्रीमद् भागवत हे महापुराण आहे. शब्द – स्पर्श – रूप – रस – गंध या विषाने जीवाचा मृत्यू होतो. जीवाचा उद्धार श्रीमद् भागवताने होतो. वेदशास्त्रांचा संपूर्ण सार एकाच ग्रंथात आहे आणि तो म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ. वैष्णवांचे परम धन म्हणजे भागवत असे सांगत भागवत या शब्दाचा अर्थ सांगताना भा म्हणजे भाव. ग म्हणजे ज्ञान. व म्हणजे वैराग्य. त म्हणजे तप असल्याचे महाराजांनी सांगितले.
दासीपुत्र नारदाने व्यासांना स्वतःची जीवनकथा सांगितली यात निष्काम भक्तीचे वर्णन करताना महाराज म्हणाले, संतांच्या दृष्टीत अमृत असते. विषयरुपी विष गुरुकृपेमुळे नष्ट होते. नारदांच्या मातेचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला. त्यानंतर नारद भगवंताचा ध्यास करू लागले. अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यावर भगवंताने बाळकृष्ण रुपात दर्शन दिले व लगेचच अदृश्य होत
आकाशवाणी झाली, त्यामध्ये पुढील जन्मात भगवंताने नारदांना प्रत्यक्ष दर्शन देईल असे सांगितले. नारदांनी त्या जन्माची जीवन यात्रा संपविली. पुढील जन्मी ते नारद म्हणून जन्माला आले. सरस्वती मातेने त्यांच्या हाती विद्या आणि विणा दिला. म्हणून निष्काम भक्तीचा ग्रंथ लिहिण्याचा उपदेश नारदांनी व्यासांना केला. त्यावर व्यासांनी भागवत लिहिण्यास प्रारंभ केला असल्याचे रामगिरी महाराज यांनी सांगितले.



