कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आपला हॉकीच्या मैदानावरचा दबदबा अबाधित राखला असून विभागीय स्पर्धेत केलेल्या दिमाखदार कामगिरीची लय कायम ठेवून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात कोल्हापूर टीमचा २-० ने पराभव करुन राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.
जिल्हाक्रिडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा दि.२५ व २७ सप्टेंबर रोजी शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या. सदर स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्यूनियर संघाने विजेतेपद पटकावले असून हा संघ दिल्ली येथे होणा-या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्यूनियर संघाने नागपूर विभागाचा ५-० व सेमी फायनलमध्ये छ. संभाजीनगर (औरंगाबाद) संघाचा २-० गोलने एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात देखील विजयी घौडदौड कायम ठेवून कोल्हापूर विभागावर २-० गोल फरकाने दणदणीत विजय मिळवून राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत सालाबाद प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची पंरपंरा कायम राखली आहे.
गौतमच्या सब ज्यूनियर संघाकडून कर्णधार मंथन देवरे (मुंबई), उपकर्णधार शोएब शेख (छ.संभाजीनगर) तसेच सुरज पाटील, श्रेयस तासकर, विपुलकुमार साळुंके, रोनक पाटील, क्षीरसागर ओम, द्रोण अहिरे, आयुष मोगल, ओम मुरडनर (नाशिक), कैलास गायके, सार्थक लगड, समर्थ पवार (छ.संभाजीनगर), संकेत गायकवाड (जळगाव), सोहम खिरीड (पुणे) श्लोक महागावकर (अकोले) यांनी आपल्या संघासाठी नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे गौतमच्या संघाने या यशाला गवसणी घातली. गौतमच्या हॉकी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, क्रिडा शिक्षक राजेंद्र आढाव, इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्थ आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच संस्थेचे सर्व सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन करून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.गौतम मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाची निर्मिती होणार.
क्रिडा क्षेत्रात गौतम पब्लिक स्कूलचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आजवर अनेकवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले हि संस्थेसाठी भूषणावह आहे. विद्यार्थ्यांना तंत्र शुद्ध शिक्षणाबरोबरच गौतम पब्लिक स्कूलने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवावे हा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूलमध्ये लवकरच Astroturf ऍस्ट्रोटर्फ (कृत्रिम मैदान) ची निर्मिती करणार आहे. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूलमध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील व राष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडा स्पर्धा देखील पार पडतील -सचिव सौ.चैतालीताई काळे