कर्जत ( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सर्वसामान्य, गरीब,वंचित, दिव्यांग यांचे अश्रू पुसण्याचे काम केले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही हे काम करत असून याचाच एक भाग म्हणून आज शासन आपल्या दारी उपक्रमात जनतेच्या दारी जावून त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे,रेशन कार्ड, डोल देत असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
कुळधरण.ता.कर्जत येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, तालुकाअध्यक्ष श्री शेखर खरमरे, श्री दीपक पाटील, श्री बापूसाहेब नेटके, श्री शांतीलाल कोपनर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की जनतेच्या मनातील सरकार असल्याने सर्व योजनांचा लाभ आता नागरिकांना मिळत आहे, मागील आघाडी सरकारच्या काळात काही दिल्याशिवाय काही मिळत नव्हतं मात्र आमच्या महायुतीचे सरकार आल्यावर आम्हीच तुम्हाला जे जे हवं ते देण्यासाठी तुमच्या दारी आलो आहोत. आघाडी सरकारच्या तीन वर्षाच्या कारभाराने आपले राज्य पाच दहा वर्षे मागे गेले, मात्र आता राज्यात आलेले सर्वसामान्यांचे हे महायुतीचे सरकार दिवसरात्र एक करून आपल्या भल्यासाठी विकास योजना राबवित आहे. एवढेच नाही तर केंद्रातील मोदी सरकार हे कायम वंचित, पीडित, दिव्यांग बंधू भगिनी साठी मागील नऊ वर्षांपासून अविरत काम करत आहे. परवाच महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्याचा एकमुखाने धाडसी निर्णय घेतला, विरोधक यात ही राजकारण करत असून निर्णय घेण्याचे धाडस हे फक्त मोदी यांनी केले, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला मात्र असे धाडसी निर्णय कोणीच घेतले नाही असे त्यांनी सांगून विरोधकांच्या टीकेला कामातून त्यांनी उत्तर दिले आहे. आणि याच पाऊल वाटेवर आपणही त्यांचा आदर्श घेवून मागील साडेचार वर्ष काम करत आहोत. लोकांशी संपर्क ठेवण्या पेक्षा विकास कामातून तो लोकांना अनुभवता यावा यासाठी काम करतो असे सांगितले.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, या बरोबरच स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे काम प्राधान्याने करावयाचे असून आता देशात आणि राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे तुम्ही मागणी करा त्यानुसार तुमचे काम करण्याचा शब्द याप्रसंगी खा.विखे यांनी दिला.
व्यक्तिगत स्वार्थाचा विचार करू नका यामुळे समाज संपून जाईल, समाजासाठी अर्ध्या रात्री आवाज द्या मी हजर असेल अशी ग्वाही देवून घन कचरा व्यवस्थापन, घरकुल,पाणीपुरवठा योजना यासाठी जर शासकीय जमीन लागत असेल तर त्याची यादी करून द्या ती तुम्हाला राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देवू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
या कार्यक्रमा आधी कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री सचिन पोठरे, श्री मंगेश पाटील, श्री दादासाहेब सोनमाळी, सरपंच सौ प्रभा पाटील तसेच शासकीय अधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.