कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- हरितक्रांतीचे जनक, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, रॅमन मेगॅसेसे पुरस्कार विजेते माजी खासदार, पदमश्री मनकोम्बु संबासिवन उर्फ एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषीक्रांतीचा स्वामी हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही एम. एस स्वामीनाथन यांच्या निधनाबददल श्रध्दांजली वाहिली.
श्री. बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, तामिळनाडुच्या कुंभकोणम येथे एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म झाला होता. भारत देशातील भुकबळींची वाढती संख्या विचारात घेवुन त्यांनी अमेरिकन संशोधक नॉर्मन बोरलॉग यांच्याबरोबर काम करून कमी खर्चात, कमी पाण्यांत अधिकचे गहु उत्पादन देणारी जात विकसीत केली त्यामुळेच त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जायचे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी सातत्याने शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांची भेट घेत विचार जाणून घेतले, जिरायत भागातील शेतक-यांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले व स्वामीनाथन कृषी शैली प्रेरणेतून स्व. कोल्हे यांनी शेतक-यांसाठी सोप्या भाषेत लिखाण केले.
स्वामीनाथन यांच्या गहु क्रांतीमुळे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशातील शेतक-यांना मोठया प्रमाणांत फायदा होवुन त्यांची आर्थीक क्रयशक्ती वाढली. एम. एस. स्वामीनाथन हे भारतीय कृषी अनुसंधान संस्थानचे प्रमुख होते. कृषिमंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी सी. सुब्रम्हण्यम व जगजीवन राम या दोन केंद्रीय कृषीमंत्र्यांबरोबर काम केले होते. स्वामीनाथन यांचे वडील गांधी विचाराने प्रेरीत झाल्यांने त्यांनी पोलिस अधिकारी होण्यापेक्षा शास्त्रज्ञ स्तरावरचा अभ्यास करून गोर गरीब, वंचित घटकाबरोबरच, सर्व पीक उत्पादनाबाबत शेतक-यांसाठी काम करून जगात नांवलौकीक कमावला. त्यांच्या कृषीक्रांतीच्या प्रभावामुळे त्यांना देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांच्या जाण्याने कृषीक्रांती आत्मा हरपला असून, कृषी संशोधनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वडीलांप्रमाणेच त्यांच्या मुली कर्तबगार असुन सौम्या हया जागतिक आरोग्य संघटनेत शास्त्रज्ञ, मधुरा हया अर्थशास्त्रात तर नित्या हया ग्रामिण विकासात काम करत आहेत.




