वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी जिल्ह्यातील पाच कुख्यात गुन्हेगारांच्या हद्दपारच्या प्रस्तावांचे अवलोकन करून दोघांना संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले. तर उर्वरित तिघांना चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर हद्दपारच्या कारवाईतून अभय दिले आहे.
वैजापूर शहरातील मुळे गल्ली भागात राहणारा संतोष बाळनाथ मापारी (३१) व माळी सागज येथील रहिवासी लंकेश सत्यवान पवार (३८) या दोघांना संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध हाणामारी, दंगल, विनयभंग,जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. वडारवाडा भागात राहणारा चंदर गणेश शिंदे (३६), रोटेगाव येथील किरण काकासाहेब शिंदे (२२) व भाऊसाहेब निवृत्ती तुरकणे (लाखगंगा) या तिघांची चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर हद्दपारीच्या कारवाईतून सुटका केली आहे. त्यांनी चांगल्या वर्तवणुकीचा पाच हजार रुपयांचा बॉन्ड, व तेवढ्याच किमतीचा प्रतिष्ठीत व्यक्तीचा (ज्यावर गुन्हा दाखल नाही असा) जामीन सादर करण्याचे आदेशात म्हंटले आहे.
जिल्हा अधीक्षक यांनी सादर केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांची उपविभागिय पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करुन चौकशी अहवाल उपविभागिय अधिकारी डॉ जऱ्हाड यांना पाठवला होता. त्यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले. चौकशी अहवाल, प्रकरणातील कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केल्यानंतर दोघांचा युक्तीवाद अमान्य करण्यात येऊन त्यांना संभाजीनगर जिल्ह्यातुन एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.