कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पूर्वी मुली शिक्षणात मागे असायच्या त्या त्यावेळच्या सामाजिक बंधनामुळे. मात्र कोल्हारच्या रयत शाळेत ९९ टक्के मुलीच बाजी मारत आहेत. मुली पुढे अन मुले मागे हा विरोधाभास असल्याने मुलांनी याचा विचार करून मुलींच्या बरोबरीने पुढे जायला हवे. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात रयतेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा तळागाळात पोहोचविली. याचा सदूपयोग रयतच्या गोरगरीब मुलांनी केल्यास हीच खरी श्रद्धांजली कर्मवीरांना ठरेल. असे प्रतीपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोल्हारच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती सलाबाद प्रमाणे साजरी झाली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ. आशुतोष काळे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू होते. यावेळी स्थानिक स्कुल समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, रमेशराव निबे, संजय शिंगवी, राजेंद्र खर्डे, अजित मोरे, वसंत खर्डे, देणगीदार अनुराधा पाटणकर, चंद्रकांत नलगे, रामनाथ बोरसे, शिरीष खर्डे, सुनील भणगे, बाळासाहेब खर्डे, बी.के. खर्डे, सुनील खर्डे, पांडुरंग देवकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी व सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचविण्याचे काम कर्मवीरांनी केले. शिक्षणाची संधी यामुळे तळागाळातील मुलांसाठी उपलब्ध झाली.
यावेळी ॲड. सुरेंद्र खर्डे म्हणाले,विद्यालयात मुलींसाठी अद्यावत स्वछतागृह बांधले. त्याप्रमाणे मुलांसाठी सुद्धा भविष्यात स्वच्छतागृह उभारले जाईल. माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व देणगीदारांनी दिलेल्या पैशातूनच रयतचे वैभव वाढत आहे. वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेत मुलीच अव्वल आहेत. मात्र मुले मागे असल्याची खंत त्यांनी व्यक्त करीत मुलांनीही मुलींप्रमाणे सर्व क्षेत्रात आघाडी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वी मुलांची सत्ता आता मात्र मुलीच पुढे असल्याने मुलांनीही मुलींप्रमाणे कष्ट घ्यावेत. असे सांगत देणगीदारांच्या मूळेच कोल्हार रयतचे वैभव वाढत असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अरुण कडू म्हणाले, शिक्षणाची पायाभूत व्यवस्था कर्मवीरांनी केली. ग्रामीण भागात खरी ज्ञानाची गंगा कर्मवीरांनी आणली. मात्र आज शिक्षण महाग झाले आहे. ग्रामीण भागात आता पहिल्यासारखी परिस्थिती नसून अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आहेत. येथे खुप खर्च असल्याने आता विनामूल्य शिक्षण मिळेनासे झाले आहे. विनामूल्य शिक्षण आपला हक्क असून शासनाकडून विनामूल्य शिक्षण हवे असेल तर शासनासोबत झगडावं लागेल असे ते म्हणाले.
अंदाजे १४ लाख रुपयांच्या खर्चाचे मुलींच्या अद्यावत नवीन स्वच्छतागृहाचे उद्घाटन यावेळी आ.आशुतोष काळे यांच्याहस्ते करण्यात आले. २०२२-२३ मधील विविध स्पर्धा व गुणवंत विध्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. तसेच देणगीदारांना सन्मानित करण्यात आले. देणंगीदारांमध्ये शिक्षक सेवकांनीही स्वछतागृहास देणगी दिली. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य सुधीर वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. शिंदे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे यांनी केले.




