नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर तालुक्यातील नगर तालुका महाविकास आघाडीला भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी जोरदार धक्का दिला आहे. स्व. खासदार दादापाटील शेेळके यांचे नातू खारे कर्जुनेचे उपसरपंच अंकूश शेळके यांचा भाजपमध्ये प्रवेश करुन कर्डिले यांनी एकाच दगडात अनेक पक्षी गारद केले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेळके यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे सध्या तरी नगर तालुक्याचे राजकारण पालटले आहे.
स्व. खा. दादापाटील शेेळके यांचे नातू खारे कर्जुनेचे उपसरपंच अंकूश शेळके यांचा भाजपमध्ये प्रवेश
नगर तालुयातील काँग्रेसचे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी बुधवारी (दि.१९) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे नगर तालुयातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी होण्यापूर्वी तब्बल १२ वर्षे अगोदर नगर तालुयात माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी या तीन पक्षांची तालुका महाआघाडी केली होती. तेव्हापासून सलग ३ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाआघाडीने एकत्र लढवत माजी मंत्री कर्डिले गटाला पराभूत केले होते.
नुकत्याच झालेल्या नगर तालुका बाजार समिती निवडणुकीतही महाआघाडी विरुद्ध कर्डिले गट अशी लढत झाली. त्यात अंकुश शेळके यांनी महाआघाडीकडून उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.



