spot_img
spot_img

पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी रडकुंडीला कोल्हार परिसरात दुबार पेरणीचे संकट

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- पाऊस रुसला की डोळे वटारले तेच समजण्यापलीकडे झाले. दररोज आभाळ दाटून येते मात्र त्याला पाझर काही फुटेना. आधीच मान्सूनने उशिरा सलामी दिली. आणि एक दोन पावसाचा शिडकावा करून त्याने दडी मारली. त्यामुळे प्रवरा परिसर तथा कोल्हार भगवतीपूर परिसरात शेतकऱ्यांवर मोठे संकट ठाण मांडून उभे राहिले. आधीच चोहोबाजूंनी मेटाकुटीला आलेला बळीराजा गोंडस नावापुरताच राजा राहिला की काय ? असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली. समस्यांना सामोरे जातांना रडकुंडीला जीव आल्यागत अवस्था झाली.

 कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट. कधी पिकांवरील रोगराई तर कधी खंडित वीजपुरवठा. यातून सहीसलामत पिक हाती आलेच तर शेतीमालाला योग्य भाव नाही. बळीराजा म्हणू म्हणू या राजाचा बळी घेण्याचे कारनामे सुरु आहेत. सरकार कोणतेही असेना, प्रत्यकाने घोषणांचा पोकळ पाऊस पाडायचे धोरण ठेवले. आश्वासनांचे गाजर दाखवून येरे माझ्या मागल्या ही रीत आणि गत करून टाकली. 

सद्यस्थितीत आवर्षणाची धास्ती पडली आहे. मान्सून सुरु होऊन मोठा कालावधी उलटला परंतु कोल्हार भगवतीपूर परिसरात अद्यापि पेरणीयोग्य पाऊस झालाच नाही. उशिराने एक – दोन पाऊस झाले. त्यावर भरवसा ठेऊन काही शेतकऱ्यांनी धाडसाने खरीपाची सोयाबीन पेरणी व कपाशी लागवड केली. मात्र पुढे जसा पाऊस पाहिजे तसा होईना किंबहुना पावसाचा पत्ताच नाही. बऱ्याच ठिकाणी इवल्याश्या वाढलेल्या पिकांनी माना टाकल्या. पावसाने ताणल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अधूनमधून कधीतरी नावापुरती रिमझिम होते, त्यामुळे शेतात तण वाढू राहीले. पिक राहीले बाजूला तणनाशकाचाच खर्च वाढू लागला आहे. खुरपणी, निंदनी करण्यासाठी मजूर मिळत नाही. यदाकदाचित मिळालेच तर मजुरीचे दर गगनाला भिडलेले.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने हालअपेष्ठांमध्ये आणखी भर पडते. एकतर शेतीकरिता पुरेशी वीज मिळेना. जी काही थोडीफार वीज मिळते त्यातून शेतीपिकांना पाणी देणे तर दूर जनावरांना पाणी देणे दुरापास्त झाले. याबद्दल तक्रार करायची सोय नाही. तक्रार करून वाईटपणा घ्यायचा कोणी ? हा प्रश्न येतो. आहे त्यात कसेबसे जुळवून घ्यायचे एवढा एकच पर्याय समोर उरला. यामुळे शेतकरी हतबल झाला असून आणखी काय आणि किती सोसायचे ? हा सवाल आहे. 
रात्रीची वीज मिळालीच तर भरीसभर म्हणून बिबट्याची दहशत कायमची ठरलेली. पाळीव जनावरांप्रमाणे बिबट्या सर्वत्र ठाण मांडून बसलेला. बिबट्याने तर शेती परिसरात प्रपंच थाटून वास्तव्याचे हक्काचे ठिकाण बनविलेले. शेतकऱ्यांसाठी ती भीती वेगळीच. वन अधिकाऱ्यांना पिंजरा लावायला सांगायचा तरी कुठे कुठे ? 
शेतीचा खर्च भरमसाठ वाढला. त्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प. उत्पादन खर्च आणि भाव यांची तोंडमेळ करता करता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. एकंदरीत असंख्य समस्यांचा भडीमार सोसत शेती करायची आणि आभाळाकडे टक लाऊन पावसाची प्रतीक्षा करायची. शेतकऱ्यांचे रडगाणे ऐकायला सवड कुणालाच नाही अशी स्थिती झाली. पाऊस आणखी लांबणीवर पडला तर हे संकट आणखी गहिरे होणार हे नक्की.
१ ) डाळिंब निघायची वेळ अन भाव पडले…
सध्या फळबागांमधून निघणाऱ्या डाळिंब, पेरू यांचे भाव व्यापाऱ्यांनी पाडले. उत्तर भारतात पूर परिस्थिती बिकट झाल्याने व्यापारी फळांचा माल उचलेना. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. चांगला भाव मिळणार होता तो ढासळला. शासनाने फळबागेतील माल थेट खरेदी केला तर फळ बागायतदार शेतकऱ्यांना आधार मिळेल. प्रवरा परिसरात डाळिंबाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डाळिंबाचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
(स्वप्निल निबे)
(संचालक) -: विखे पाटील कारखाना

२) खरीप हंगाम मोठ्या संकटात जाण्याची भीती 
यावर्षीचा पावसाळी हंगामाची सुरुवात पाहता असे वाटते की, खरीप हंगाम मोठ्या संकटात जाण्याची शक्यता आहे. काही भागात अत्यंत थोड्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात पेरणी केली. परंतु तेव्हापासून पावसाने दडी मारली. आणखी आठवडाभर पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते. पाऊस लांबणीवर पडल्याने खरीपातील कपाशी सारख्या पिकांमध्येसुद्धा रोग व किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच पिकांची वाढ समाधानकारक होत नाही.   
(धनंजय दळे )
(संचालक )-: विखे पाटील साखर कारखाना
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!