नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- मागील अनेक वर्षांपासून रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी उद्योजकता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केवळ कुटुंबाच्या गरजा भागविणे हाच उद्योजकाचा उद्देश नसून व्यवसायातून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करणे हा आहे, असे वक्तव्य कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. सलील पेंडसे यांनी व्यक्त केले. उद्योजकतेमुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळविल्यानंतर योग्य तो व्यवसाय निवडून तो चालवला तर संपन्नता वाढते, कुटुंबाचा आर्थिक आधार प्राप्त होतो, जीवन जगण्याचे साधन उपलब्ध होते आणि त्यातून कुटुंबाचा सर्वांगीण विकास साध्य होतो. याच उद्देशाने उद्योजकता विकास या विषयावर व्याख्यान नेप्ती येथील छत्रपती अभियंत्रिकी विद्यालयामध्ये संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी जर उद्योजकता विकासासाठी लागणारे कौशल्य आत्मसात केले तर निश्चितच भविष्यात त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले. विद्यार्थी आणि व्याख्याते यांच्यातील सुसंवाद आणि प्रश्नोत्तरे यामुळे व्याख्यानाला वेगळीच रंगत आली.
कार्यक्रमास सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, ई अँड टी सी विभाग प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे यांच्यासमवेत प्रा. एस. ए. वणवे, प्रा. डी. आर. कळसे, प्रा. पी.एस. कोहकडे, प्रा. अक्षय देखणे, प्रा. नीता गाडे, प्रा. टी. पी. धंगेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन द्वितीय वर्ष संगणक विभागाची विद्यार्थिनी साक्षी पुरी हिने तर आभारप्रदर्शन श्रावणी मनकापूरे हिने केले.




