श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अतिवृष्टी अनुदान आणि अग्रीम विमा अनुदानाच्या मागणीसाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात घेरावो आंदोलन करण्यात आले. तीन दिवसात अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, तसेच अग्रिम विमा अनुदानही लवकरच मिळेल, असे लेखी आश्वासन तहसिलदार श्री. वाघ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक कानडे म्हणाले कि, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नावानिशी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी व आवश्यक ती पूर्तता केली आहे, तरी अद्यापही हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी वारंवार हेलपाटे मारत आहेत. याबाबत चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्याप्रमाणे संपूर्ण अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे 5 कोटी रु.चे अधिकचे अनुदान मागितले आहे, असे सांगण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून अनुदानाअभवी नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.
याशिवाय तालुक्यात पावसाने सलग 46 दिवसांपेक्षा अधिक खंड दिला. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. श्रीरामपूर मतदार संघातील शेतकऱ्यांनी एक रूपया भरून नविन पीक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. तालुक्याच्या आमसभेत शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीबद्दल आक्रोश व्यक्त केला. त्यानुसार आ. लहू कानडे यांनी पीक विमा योजनेतील नियमानुसार 20 दिवसांपेक्षा अधिक खंड झाल्यामुळे 25 % विमा अग्रीम अनुदान विमा कंपन्यांनी तात्काळ द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली. त्यानुसार कृषी आणि तहसील विभागाने कार्यवाही केली. शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करून सहकार्य केले. तालुक्यातील सर्व कृषी मंडळे अग्रीम पीक विम्यासाठी पात्र ठरली असताना शासनाकडून अद्यापही अग्रीम पीक विम्याची 25 %रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत असून दसरा, दिवाळी सणाचे दिवस तोंडावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमानुसार त्यांच्या हक्काची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली.
तालुक्यातील २५ हजार बाधित शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून केवायसी अभावी काही जणांचे अनुदान जमा होणे बाकी आहे. केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ती करून घ्यावी, केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना शनिवारपर्यंत अनुदान प्राप्त होईल, तसेच पिक विम्याची अग्रीम रकमेसंदर्भात आजच शासन स्तरावर निर्णय झाला असून ही रक्कमही लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असे लेखी आश्वासन तहसीलदार श्री. वाघ यांनी यावेळी दिले. तहसीलदार श्री. वाघ यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी कॉंग्रसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, अमृत काका धुमाळ, शहराध्यक्ष प्रविण काळे, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सरपंच अशोक भोसले, रा. ना. राशिनकर, अविनाश पवार, भागीनाथ शिरोळे, बाळासाहेब शिरोळे, तसेच कार्लास साठे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अजिंक्य उंडे, अमोल आदिक, भारत बढे, युनुस पटेल, आबा पवार, भैय्या शहा, आशिष शिंदे, प्रशांत कवडे, माणिक देसाई, बापू सदाफळ, बाबासाहेब ढोकचौळे, अभिजित बोर्डे, विलास दरेकर, अनिल दांगट, सुनील कवडे, विश्वास तनपुरे, राजेंद्र भिंगारे, योगेश आदिक, बाबासाहेब जगताप, कासम शेख आदी उपस्थित होते




