श्रीरामपूर दि १२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील खेळाडूसाठी सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडीया उपक्रमाचे यश एशियन स्पर्धेत दिसून आले आहे.अस्लम ईनामदार सारख्या असंख्य खेळाडूनी गावाबरोबरच देशाचेही नाव मोठे केले.अस्लमचा पुढील प्रवास अधिक यशस्वी होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
एशियन खेळाच्या स्पर्धेत कबड्डी खेळामध्ये सुवर्ण पदक मिळविलेला टाकळीभानचा सुपूत्र अस्लम शेख यांचा नागरी सत्कार मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.शशिकांत गाढे नानासाहेब पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे नितीन दिनकर दिपक पठारे व्हा अभिषेक खंडागळे इंद्रभान थोरात सरपंच सौ.अर्चना ननवरे यांच्यासह अस्लम ईनामदार यांचे कुंटुबिय उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की अस्लमचे यश गावापुरते सिमित नाही ते देशाचे यश आहे.या यशाने जिल्ह्याचा नावलौकीक झलाच पण कबड्डीच्या खेळात देश अग्रेसर आहे हे सुध्दा या यशाने दाखवून दिले आहे.
देशात आज क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम पंतप्रधान मोदीजीच्या नेतृत्वाखाली होत आहे.खेलो इंडीया उपक्रमामुळे अनेक खेळाडूना संधी मिळाल्या.प्रो कबड्डीच्या माध्यमातून पुढे आलेले कबड्डी पटू जगाच्या पाठीवर इतर देशांच्या पुढे जात असल्याचा अभिमान असून अतिशय सामान्य परीस्थीती असतानाही अस्लमच्या यशाने त्यांचे कुटुंबिय सुध्दा भारावले आहेत.या खेळाडूच्या मागे उभे राहाणे कर्तव्य असल्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व सहकार्य करण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
अस्लम शेख याने आपल्या सत्काराला उतर देताना परीस्थीतीवर मात करता येते दिवस बदलतात फक्त कष्टाची तयारी ठेवा.गावातील खेळाडूना देशपातळीवर घेवून जाण्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.शशिकांत गाढे यांनी अस्लमच्या वाटचालीचा आढावा घेवून प्रो कबड्डीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील अनेक कबड्डी पटू देशात राज्यात यशस्वी झाले असून नुकत्यात नगर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धा मॅटवर प्रथम खेळविल्या गेल्या यासाठी मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून असोसिएनच्या वतीने विखे पाटील आणि अस्लमचा त्यांनी गौरव केला.
याप्रसंगी नानसाहेब पवार यांचेही भाषण झाले इतरही खेळाडूना सन्मान करण्यात आला.ग्रामस्थ क्रीडाप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




