कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रित वस्तीस्थान असलेल्या प्रख्यात श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवतीमातेचा शारदीय नवरात्र महोत्सव रविवार दि. १५ ऑक्टोबर ( घटस्थापना ) ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर २०२३ ( विजयादशमी ) या कालावधीमध्ये हर्षोल्हासात संपन्न होत आहे. या कालावधीमध्ये दररोज सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे यांनी दिली.
तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, कोल्हार भगवतीपूरची भगवतीमाता व वणीची सप्तशृंगीमाता या साडेतीन शक्तीपीठांचा एकत्रित दर्शनलाभ कोल्हार भगवतीपूर या तीर्थक्षेत्री भाविकांना होत असतो. नवरात्र महोत्सवाच्या काळात याठिकाणी शक्तीउपासक भाविकांची मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. हे लक्षात घेऊन देवालय ट्रस्टच्यावतीने आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मंदिर व मंदिर सभोवतालच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे याकरिता दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देणार आहेत. नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.
रविवारी सकाळी यथोचित पूजा विधी व अभिषेक करून घटस्थापना केली जाईल.उत्सवकाळात सकाळच्या सुमारास किर्तनसेवेबरोबरच मंदिराच्या सभागृहात दररोज सकाळी १० : ३० ते १२ वाजता दुर्गा सप्तशती पाठ व मंत्र जप होईल. दररोज दुपारी ३ वाजता देवी महात्म्य कथा वाचन होईल. रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होमहवन केला जाईल. मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता परंपरेप्रमाणे दसरा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल.
नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज सकाळी दहा वाजता कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून रविवार दि. १५ रोजी भागवताचार्य सौ. देवी कान्होपात्राताई, दि. १६ रोजी संपूर्णाताई टेंभरे, दि. १७ रोजी हेमलताताई महाराज पिंगळे, दि. १८ रोजी विजय महाराज कुहिले, दि. १९ रोजी रामानंद महाराज गिरी, दि. २० रोजी सुवर्णाताई महाराज जमधडे, दि. २१ रोजी पांडुरंग महाराज गिरी, वावीकर, दि. २२ रोजी अशोक महाराज भोसले, दि. २३ रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक यांची कीर्तने होणार आहेत.
आईसाहेबांची उच्च कोटीची सेवा..
.नवरात्र महोत्सव काळात सोमवार दि. १६ ते सोमवार दि. २३ ऑक्टोबर याकाळात श्री भगवतीदेवी मंदिरामध्ये श्री दुर्गा सप्तशतीपाठ, श्री स्वामी समर्थ जप, नवार्णव मंत्र जप, महामृत्युंजय जप या आईसाहेबांच्या उच्च कोटी सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही धार्मिक सेवा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विजय डेंगळे, गणेश सोमवंशी, विजय खर्डे यांनी दिली. २०११ सालापासून नवरात्र उत्सवकाळामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन केले जात आहे.




