कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हारमध्ये देवीच्या कमानीजवळ आरटीओच्या वायुवेग पथकाने एका पिकअप वाहनाची कागदपत्रे तपासण्यासाठी चालकाला थांबविले. तो घाबरून वाहन सोडून पसार झाला. तेवढ्यात तिथे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले. त्यांना पिकअपमध्ये १५ गोवंशीय जनावरे आढळली. यासोबत काही हत्यारे सापडली. जनावरांना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी चालविले होते. पोलिस चौकीवर वाहन नेण्यात आले. तिथे मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे जमले.
काल गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरटीओच्या वायुवेग पथकाचे इन्स्पेक्टर गणेश राठोड, रोशन चव्हाण, मयूर मोकळ यांनी देवीच्या कमानीजवळ गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता एका पिकअपला ( क्रमांक – एम. एच. ४१ जी. २४१२ ) थांबविले. वाहन थांबविताच चालकाने उतरुन गाडी तशीच सोडून जोराने धूम ठोकली. यासोबत आणखी एक वाहन होते, त्यानेही गाडीसह तेथून पळ काढला. एकंदरीतच हा सर्व प्रकार संशयास्पद होता.
तेवढ्यात घटनास्थळी कोल्हार भगवतीपूरमधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. वाहनाच्या मागच्या बाजूला एकूण १५ गोवंशीय जनावरे आढळली. आरटीओच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी सदर वाहन कोल्हार पोलिस दूरक्षेत्रात आणले. त्या वाहनाचा चेसी नंबर वेगळा आणि गाडीचा क्रमांक बनावट होता. कागदपत्रांची मुदत संपलेली होती. आरटीओचे अधिकारी निघून गेले.
थोड्या वेळाने कोल्हार चौकीला पोलिस आले. त्यांना सर्व हकीकत सांगण्यात आली. वाहन पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले. जनावरांना संगमनेर येथील एका गोशाळेत सुपूर्द करण्यात आले. यासंदर्भात लोणी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
कोल्हार भगवतीपूरसह आजूबाजूच्या काही गावात गेल्या काही दिवसांच्या कालावधीत अवैधरीत्या कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे तसेच गोमांस सापडले आहेत. या घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून यास पोलिस प्रशासनाने कायमस्वरूपी पायबंध घालावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे.




