नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव हे मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. याच बेलपिंपळगाव मध्ये अनेक वर्षापासून नागरिका ंना रेशन कार्ड ,जातीचे दाखले व इतर शासकीय योजनांची कामे होत नाहीत .त्यातच बेलपिंपळगावातील धान्य दुकानदार यांच्या कडुन अनेक वर्षांपासून गावातीलच जनतेवर अन्याय होताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी सात दिवसांपूर्वीच तहसीलदारांना निवेदन सादर करून गावातील आदिवासी समाजातील अनेक नागरिकांना धान्य मिळत नाही.जातीचे दाखले मिळत नाही व गावात व्यवस्थित रस्तेही नाही या सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या बेलपिंपळगाव साठी शासनाने विशेष तरतूद करावी व धान्य दुकानदाराच्या चालू असलेल्या मनमानी कारभाराला लगाम लावावा .
तसेच बेलपिंपळगाव मध्ये अंत्योदय लाभार्थी यांची 153 संख्या असून त्यांना शासनाकडून 35 किलो धान्य मिळते .मात्र हा धान्य दुकानदार फक्त 20 किलो धान्य देतो त्यामुळे या मुजोर धान्य दुकानदाराचा शासकीय धान्य वाटप परवाना रद्द व्हावा व त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना सरपंच कृष्णा शिंदे यांनी सात दिवसांच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर गावातील ग्रामपंचायत कार्याचे सर्व सदस्य, आदिवासी समाज व इतर ग्रामस्थ यांना घेऊन बेमुदत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता . मात्र या कामाची शासकीय स्तरावर कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आमच्या गावावर उपोषणाला बसण्याची वेळ शासनाने आणली असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उपोषणापासून हटणार नाही असे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
तसेच या सरकारला जाग आणण्यासाठी व आमचे हक्काचे धान्य आम्हाला मिळण्यासाठी ऐन दिवाळीत उपोषणाला बसण्याची वेळ आमच्यावर आली असून त्वरित या धान्य दुकानदारावर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असा निर्वाणीचा इशारा ही गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
उपोषणासाठी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, गावातील सर्व पदाधिकारी, आदिवासी समाजातील पुरुष ,महिला, लहान मुले व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
तसेच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील सर्व व्यापारी व नागरिकांनी आपापली दुकाने व गाव बंद ठेवले.




