9.9 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

अट्रोसिटीतील आरोपीच्या अटकेसाठी आदिवासींचा ‘रास्ता रोको’चा इशारा

नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा): – सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारालाच खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात डांबण्याचा प्रताप सोनई पोलिसांनी केल्याचा आरोप आदिवासी प्रबोधन सेवा संघाने केला आहे. आदिवासी तरुणाला अर्वाच्य शिविगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या समाजकंटकावर अटकेची कारवाई करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी सेवा संघाने पोलीस अधीक्षकांना व पोलीस उपअधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

आदिवासी प्रबोधन सेवा संघाने नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सत्ताधारी पक्षाचा स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या सतिष गडाख याने दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत कामावरून बेल्हेकरवाडी येथे राहत्या घरी जाण्यासाठी निघालेल्या रवींद्र रामदास सोनवणे या आदिवासी समाजातील तरुणाला विनाकारण रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केली. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या या आदिवासी तरुणाची तक्रार नोंदवून न घेता सोनई पोलिसांनी या तरुणास रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. राजकीय दबावाखाली सोनई पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्यास कचरत असल्याकडे संबंधितांनी पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात संबंधित पीडित आदिवासी तरुण सोनई पोलीस ठाण्यात गेल्याचे समजल्यानंतर त्या पक्षाच्या तालुक्यातील आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याने आपली राजकीय ताकद पणाला लावत आदिवासी तरुणाची फिर्याद वेळीच नोंदवू दिली नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेनंतर त्वरित पोलीस ठाण्यात समक्ष हजर होऊनही त्याची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोनई पोलिसांनी नंतर आलेल्या आरोपीची खोटी फिर्याद मात्र तातडीने नोंदवून घेतल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर पीडित आदिवासी तरुणाची अनुसूचित जाती, जमाती संरक्षण कायद्यांतर्गत फिर्याद नोंदवून घेतल्यावर आरोपीला अटक करण्याऐवजी त्याला मोकाट सोडून देत खोट्या गुन्ह्यातील आदिवासी तरुणाला मात्र तुरुंगात डांबण्याची मर्दुमकी सोनई पोलिसांनी गाजविल्याकडे संबंधितांनी पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली सोनई पोलीस ठाण्यात ‘उलटा चोर कोतवाल दांटे’ या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय आल्याचा आरोप केला आहे.

अट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी सतिश गडाखच्या त्वरित मुसक्या आवळून पीडित आदिवासी तरुणाला न्याय न दिल्यास तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा गर्भित इशारा जिल्हाध्यक्ष कुमार माळी, नेवासा तालुकाध्यक्ष शाम मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!