कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने यावर्षी भागवताचार्य तेजस्विनी पाठक यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसगाव प्रवरा येथे नवरात्र उत्सवाचे यंदाचे हे ५२ वे वर्ष आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुपारी १२ ते १ वाजता दुर्गा सप्तशती पाठ, सायंकाळी ५ : ३० ते ७ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ७ ते १० वाजता भागवत कथा असे दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
रविवार दि. १५ रोजी येथे घटस्थापना करण्यात आली. शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी येथे सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजता भागवताचार्य तेजस्विनी पाठक यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल.
मंगळवार दि. १७ ऑक्टोबर पासून भागवत कथा पारायणास सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी भागवत कथेमध्ये शुक मुनी आणि परीक्षित राजा संवाद, दुसऱ्या दिवशी शिव पार्वती विवाह संपूर्ण गण, तिसऱ्या दिवशी मीराबाई चरित्र, नरसिंह भगवान, चौथ्या दिवशी वामन भगवान राजा बली, कृष्ण जन्मोत्सव, पाचव्या दिवशी गोवर्धन पूजा, दुर्गा मातेचे चरित्र व झाकी, सहाव्या दिवशी कृष्ण राधा रासलीला, रुक्मिणी स्वयंवर आणि सातव्या दिवशी सुदामा चरित्र व फुलांची होळी असणार आहे.
रात्री दररोज भागवत कथेनंतर तिसगाव प्रवरा येथील ग्रामस्थ व भाविकांकडून महाप्रसादाची पंगत दिली जात आहे.



