कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे मळगंगा देवस्थान आहे. पुरातन काळापासून प्रवरा नदीच्या तीरावर स्वयंभू मळगंगा देवीचे हे धार्मिक ठिकाण आहे. कोल्हार खुर्द व रामपूर या दोन गावांच्या शिवावर हे देवस्थान वसलेले आहे. देवीचे हे जागृत देवस्थान असून मळगंगा देवी भक्तांच्या नवसाला पावते व भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते अशी देवी भक्तांची श्रद्धा आहे. जिल्ह्यातून तसेच पंचक्रोशीतून येथे अनेक भाविक मोठ्या संख्येने श्रद्धापूर्वक देवीच्या दर्शनासाठी येतात.
नगर – मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द गावापासून साधारणतः या देवस्थानचे अडीच किलोमीटर अंतर आहे. कोल्हार खुर्द ते रामपूर रोडलगत निसर्गरम्य ठिकाणी देवीचे सुंदर मंदिर उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी दरवर्षी आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवार, गुरुपौर्णिमा, आषाढी अमावस्या यादिवशी यात्रा भरते. यादिवशी कोल्हार खुर्द व रामपूर येथून दोन्ही गावच्या मानाचा काठ्या येथे येतात व संध्याकाळी महाप्रसाद व जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होते.
सालाबादप्रमाणे येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. नवरात्रीच्या काळामध्ये महिला व पुरुष नऊ दिवस येथे घटी बसतात. नवरात्रीमध्ये याठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. याकाळामध्ये भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात.
मळगंगा देवीचे मूळ ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज या गावी आहे. त्याठिकाणी चैत्र वैद्य अष्टमीला यात्रा भरते व घागर निघते. यादिवशी कोल्हार खुर्द ते निघोज पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. या दिंडीमध्ये भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. दिवसेंदिवस मळगंगा देवीचा महिमा वाढत चालला असून नवरात्र काळात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.



