श्रीरामपूर( जनता आवाज
वृत्तसेवा ):-तालुका विधी सेवा समिती व श्रीरामपूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट झेवियर्स मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
शहरातील सेंट झेवियर्स या शाळेमध्ये जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुला-मुलींच्या सुरक्षितते संदर्भात असणाऱ्या कायदेविषयक शिबिराचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. इ.०९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.यादव यांनी पोक्सो कायद्यातील तरतुदी व उद्दिष्टे यावर चर्चा करताना सांगितले की, लहान मुला- मुलींच्या संदर्भात घडणाऱ्या दुर्दैवी घटना मोठया प्रमाणावर घडत आहे त्या थांबविण्यासाठी पालकांसहित सर्व सामाजिक घटकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. या कामी आई-वडील व मुलांचा मुक्त संवाद होऊन मैत्रीचे नाते प्रस्थापित होणे काळाची गरज आहे. मुलांनो संस्कारशील रहा. तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक व्हा. कायद्याच्या चौकटीत राहून उज्वल भविष्य घडवा. एक न्यायाधीश म्हणून नव्हे तर पालक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो. अशी भावनिक साद ही त्यांनी विद्यार्थ्यांना घातली.
दरम्यान दिवाणी न्यायाधीश आर.बी. गिरी म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांनी मिळवले पाहिजे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात सभोवताली मिळणारे चांगले शिक्षण देखील महत्त्वाचे असते. स्वतःच्या हक्का साठी व अधिकाराविषयी जागृत राहण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व सांगून वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.समीन बागवान यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक रवि त्रिभुवन यांनी केले यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.यादव, दिवाणी न्यायाधीश आर.बी. गिरी,
सह दिवाणी न्यायाधीश व्ही बी कांबळे, सौ.एस व्ही मोरे, सौ.डी. एस.खोत, वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.समीन बागवान, प्राचार्य फा.टायटस थंगराज, विधी सेवा समितीचे समन्वयक उमेश बळे व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य फा.टायटस थंगराज यांनी उपस्थितांचे आमचे आभार मानले.



