लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-महीलांसाठी मिळणारे व्यासपीठ हे महत्वपूर्ण असते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या बचत गट चळवळीतून महीला खऱ्या अर्थाने साक्षर आणि निर्भय होत आहेत असे प्रतिपादन ओमशांती प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय लोणी येथील आशा दिदी यांनी केले.
रणरागिणी महीला मंडळाच्या वतीने नवराञ उत्सवानिमित्त लोणीत आयोजित जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आशा दिदी बोलत होत्या. यावेळी रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षणाधिकारी सौ. लिलावती सरोदे आदीसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवरात्र उत्सव आणि स्त्रीशक्ती याविषयांवर महीलांना प्रबोधन करतांना जनसेवा फौडेशन आणि रणरागिणी महिला मंडळाच्या विविध उपक्रमामुळे महीलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आपल्या संस्कृतीचा परिपाक होणारा जागर हा महीलांसाठी महत्वपूर्ण असल्याचे आशा दीदी यांनी सांगून नवरात्र उत्सवातून आपल्या वाईट गोष्टीचा उपवास करा असे सांगितले. यावेळी सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी रणरागिणीच्या कार्याचा आढावा घेत महीलांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ओमशांतीच्या वतीने आयोजित केलेल्या भारत माता शक्ती अवतार या ओमशांती केंद्राच्या देखाव्याद्वारे महिलांच्या शक्तीचा संदेशही देण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे, नृत्य, गायन, वेषभूषा आणि दांडिया अशा विविध स्पर्धांना महिलांनी प्रचंड प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे रणरागिणी महिला मंडळाच्या माध्यमातून हजारो महिलांना एकञ करत विविध उपक्रम,प्रशिक्षणे,सहली या माध्यमातून होणा-या विविध उपक्रमांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रणरागिणी महिला मंडळातील भगिनिंसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांना महिलांनी प्रचंड प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली व दांडिया उत्सवाचा देखील मनसोक्त आनंद लुटला याचे खूप समाधान वाटते. विशेष म्हणजे महिला भगिनींचा उत्साह पाहून निश्चितच अधिक जोमाने इतर उपक्रम राबविण्यासाठी मला बळ मिळाले आहे.खरंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्याकडून मला महिलांसाठी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
-( सौ.धनश्रीताई विखे पाटील)



