कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. सभेला लाखोंच्या संख्येने न भूतो न भविष्यती असा जनसमुदाय जमला. या सभेविषयी बोलतांना ॲड . गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा सभेची चेष्टा करत प्रक्षोभक विधाने केली. या बेताल वक्तव्यामुळे मतभेद पसरल्याने समाज बांधवांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली. या विधानांचा कोल्हार भगवतीपूर येथे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पोलिसांना यासंदर्भात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात नुकतीच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेला लाखोंच्या संख्येने समाज बांधव जमले. प्रचंड मोठा जनसमुदाय स्वयंस्फूर्तीने या सभेला उपस्थित राहिला. मनोज जरांगे पाटील यांच्या लोकोपयोगी उत्कृष्ट समाजकार्याची दखल घेण्याऐवजी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सभेविषयी प्रक्षोभक विधाने करून मराठा सभेची चेष्टा केली. सभेविषयी संतापजनक विधान करून अखिल मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचे विकृत काम केले. या ऐतिहासिक सभेला त्यांनी यात्रा म्हणून हिणवले. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मानसिक दिवाळखोरीचे आणि विकृत मनोवृत्तीचे हे लक्षण आहे. अशा या विकृत, समाजविघातक मनोप्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन लोणी पोलिसांना देण्यात आले.
याप्रसंगी सुजित खळदकर, आशुतोष बोरसे, अमोल खर्डे, मयूर कडसकर, विजय डेंगळे, प्रदीप खर्डे, गणेश सोमवंशी, संकेत कापसे, गणेश निबे, गणेश जोशी आदी उपस्थित होते.



