राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे देशातील प्रत्येक माणूस बॅकींग क्षेत्राशी जोडला गेला आहे. पोस्ट कार्यालयातून सुध्दा आता बॅंकींग सुविधा सुलभतेने मिळू लागल्या आहेत. ही वाढत स्पर्धा लक्षात घेता सहकारी पतसंस्थांनाही आता ग्राहकांना घरपोहोच सुविधा देण्याचा विचार करावा लागेल अशी अपेक्षा महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
श्री.दत्तगुरु सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक आणि मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते
तालुक्यातील गणेशनगर येथे श्री.दत्तगुरु सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पतींगराव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास चेअरमन सौ.सुनिता कासार, व्हा.चेअरमन विजय आहेर, बाजार समितीचे संचालक जालिंदर गाढवे, ज्ञानदेव चोळके, संपतराव शेळके, बापूसाहेब लहारे, संजय सदाफळ, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, सहकारी पतसंस्थांच्या चळवळीमुळे विकासाला स्थैर्य मिळाले. पारदर्शक कारभारामुळे अनेक चांगल्या पतसंस्थांनी आर्थिक क्षेत्रात आदर्श निर्माण केले आहेत. आता मल्टिस्टेटमुळे पंतसंस्थांनाही राज्यात कुठेही व्यवसाय करण्याची संधी असल्याचे स्पष्ट करुन बॅंकींग प्रमाणेच आता पतसंस्थापुढेही आर्थिक स्पर्धेचे आव्हान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशात आज प्रत्येक माणूस बॅकींग क्षेत्राशी जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळेच बॅकींग सुविधा ग्राहकांना कुठेही मिळणे शक्य झाले आहे. पोस्ट कार्यालयातही आता बॅकींगच्या योजनांची लाभ मिळू लागले आहेत. येणा-या काळात स्वस्थ धान्य दुकानातूनही बॅकींग सुविधा देण्याचे धोरण सरकारचे असणार आहे. सामान्य माणूस बॅकेंशी जोडला जावा हाच उद्देश यामागे आहे. पतसंस्थानाही आता ग्राहकांनाच सुविधा देण्यासाठी तत्पर व्हावे लागेल, घरापर्यंत सुविधा कशा देता येतील हाही विचार करावा लागेल असे त्यांनी सुचित केले.
दिलेल्या कर्जाच्या वसुलीचे मोठे आव्हान आर्थिक संस्थापुढे असते. यासाठी चांगले कर्जदार असावेत ही भूमिका असली पाहीजे. महिला बचत गटांना कर्जाची उपलब्धता करुन देण्यासाठी पतसंस्थांनी पुढाकार घेतला पाहीजे. कारण शाश्वत वसुलीही बचत गटांकडूनच होवू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



