वाशिम (जनता आवाज
वृत्तसेवा ):- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा उद्यापासून सुरू होत आहे. याची सुरुवात वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी( बंजारा समाजाची काशी) येथे होणार आहे.
बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे आस्तेचं धर्मस्थळ म्हणून ओळखले जाते. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री सेवालाल महाराजांची समाधी येथे आहे. त्याचसोबत समस्त बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा मातेचे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथून या दौऱ्याची सुरूवात होतं आहे.
शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत. पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज्यात बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीच्या दृष्टीने बंजारा समाजाची बोट बँक मोलाची ठरु शकते.