सात्रळ, दि. ६( जनता आवाज वृत्तसेवा ):-सात्रळ पंचक्रोशीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. आई-वडिलांनी मुलांना विशेषतः मुलींना खूप खूप शिकवावे. लग्नाची घाई करू नये. ज्ञानार्जन करून मुलींनी स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. सात्रळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा गागरे हिने बिबट्याचा सामना करून आपल्या भावांचे प्राण वाचवले, अशा धाडसी मुली तयार होणे काळाची गरज असल्याचे मत प्रतिपादन रणरागिणी महिला बचत गटाचे अध्यक्षा मा. सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी सौ. धनश्रीताईं विखे पाटील यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील यांनी केले. याप्रसंगी मा. सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते, जम्मुतावी येथे झालेल्या चौदाव्या युवा रत्न राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात महाराष्ट्र सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या सात्रळ येथील संग्राम सतीश पवार यांचा शाल, बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पीडब्ल्यूडी विभागातील परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे धानोरे येथील संकेत अंजाबापू शिंदे, एनएमएमएस, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी बारा हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती प्राप्त सात्रळ येथील प्रीती भाऊसाहेब पलघडमल व भूमिका स्वप्निल चोथे यांचा सत्कार करण्यात आला. बीटेक आर्किटेक्चर परीक्षेत ८२.८५ टक्के गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये २९५९ वा क्रमांक प्राप्त करणाऱ्या सात्रळ येथील स्नेहल संदीप रोकडे यांचाही सत्कार करण्यात आला.
सीईटी परीक्षेत 92 टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल सात्रळ येथील प्रणव अजित जोरवेकर तसेच नीट परीक्षेत 720 पैकी 666 गुण मिळवल्याबद्दल सात्रळ येथील सानिका गोकुळ जोरवेकर यांचा सत्कार करण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या हिंदी विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सात्रळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनंत केदारे तसेच सोनगाव येथील गणेश बाळासाहेब अंत्रे आणि माळेवाडी-डुक्रेवाडी येथील मंदाताई वसंतराव डुक्रे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे पाटील यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व प्राध्यापक उपस्थित होते.




