राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):– राहुरी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सोमवार दि.३० ऑक्ट.२३ पासून राहुरी तहसिल कार्यालया समोर साखळी उपोषण करण्यात येत आहे.या उपोषणास मराठा समाजाबरोबर सर्वच जातीधर्मातील बांधवांनी सहभागी होत पाठींबा दर्शविला आहे.
बुधवारी साखळी उपोषणाचा ३ दिवस आहे.या साखळीउपोषणातसोनगाव,सात्रळ,धानोरे,रामपूर,कानडगाव,तांदूळनेर गावातील शेकडो ग्रामस्थांनी सहभागी होत तहसिल कार्यालय परिसर घोषणा देत दणाणून सोडला.
या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे म्हणाले कि,महाराष्ट्रातील अनेक आमदार,खासदार व सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी हे राजीनामा देवून मराठा समाजाची फसवणूक करत आहेत.लोकप्रतिनिधी यांना जनता मतदान करून निवडून देतात व विधानसभेत ,लोकसभेत नागरिकांच्या व्यथा मांडण्यासाठी पाठवतात. परंतु लोकप्रतिनिधी त्यांचे काम न करता मराठा समाजाची सहानभूती मिळविण्यासाठी राजीनामा देवून आपल्या कर्तव्यापासून मैदान सोडून पळ काढत आहेत.राजकीय पुढार्यांना व पदाधिकार्यांना मराठा समाजाला न्याय मिळावा असे जर वाटत असेल तर त्यांनी राजीनामा न देता व मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी न होता तात्काळ विधीमंडळात आवाज उठवत एकमुखी मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी दबाव तयार करणे गरजेचे आहे.
तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे न देता आपल्या पक्ष प्रमुखांना मराठा आरक्षण विषयात ठोस भूमिका घेण्यासाठी दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे नाटक तात्काळ थांबून आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आव्हान लांबे यांनी केले आहे.



