टाकळीभान ( जनता आवाज
वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील
टाकळीभान येथे भुरट्या चोर्यांचे सत्र सुरू असून दिनांक २ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी श्री.साई बाबा मंदिरातील दान पेटी फोडली, सहा शेळ्या व एक दुचाकी चोरून नेली आहे. त्यामुळे या झालेल्या चोर्यांमुळे टाकळीभानसह परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील वाडगाव रस्त्यावर असलेल्या श्री. साई बाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व दान पेटी फोडून दान पेटीतील रक्कम चोरून नेली आहे. दोन तीन
महिन्यापुर्वी या मंदिरातील पितळी कळसही चोरट्यांनी चोरून नेलेला असून यापुर्वीही अनेकवेळा दानपेटी फोडून दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेलेली आहे.
टाकळीभान श्रीरामपुर राज्यमार्गा लगत भोकर शिवारातील १५ चारी परीसरातील तीन घरांमधील सहा शेळ्या व एक दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर तिसऱ्या घराचा दरवाज्याचा कोयंडा न तुटल्याने चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला मात्र तरीही चोरट्यांनी खाली हात न जाता घरमालकाच्या चपला चोरुन नेल्या आहेत.
टाकळीभान श्रीरामपुर रोडवरील भोकर सिमेलगत रहात आसलेल्या दिवटे- भोगे – बनकर वस्तीवर सोमवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन घरांवर चोरी केली. अनिल व गणेश सखाराम दिवटे यांच्या बंदिस्त शेळ्याच्या गोठ्याची जाळी उचकटुन सहा जातीवंत शेळ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. गोठ्यात आणखी हाडकुळ्या तीन शेळ्या होत्या मात्र चोरट्यांनी त्या चोरीला पसंती दिली नाही. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच आसलेल्या राजेंद्र बनकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला व तारकंपाऊंड वरुन बंगल्याच्या पोर्चमध्ये प्रवेश करुन बनकर झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद केला व कुलुप लावलेल्या बैठक खोलीच्या दरवाजाचा कोयंडा उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयंडा न निघाल्याने जवळच आसलेल्या दुचाकिची छेडछाड केली. मात्र दुचाकिचे हँडलचे लाॕक न तुटल्याने दुचाकी खाली पाडून देवून पुढे रहात असलेल्या लहानभाऊ बनकर फार्म हाऊसकडे गेले. तेथे गेटवरुन आत जात दुचाकीवर ताबा घेतला. दुचाकि गेटबाहेर काढण्यासाठी गेटजवळील जाळी तोडली व दुचाकी घेवून फरार झाले. दिवटे – बनकर जागे झाल्याने त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या बोलेरो पिकआपचा अशोकनगर फाट्यापर्यंत पाठलाग केला मात्र ती पिकअप वेगळीच निघाली. या झालेल्या चोर्यांमुळे नागरिकात खळबळ उडाली आहे. टाकळीभान परीसरातील यापुर्वी झालेल्या अनेक चोरींच्या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नसतांनाच चोरटे वारंवार पोलिसांना आव्हान देतांना दिसत असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. याबाबत दिवटे – बनकर तसेेच
साईबाबा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त यांनी श्रीरामपुर तालूका पोलिस ठाण्यात घटनेची माहीती दिली आहे.




