spot_img
spot_img

सुजय विखेंनी फोडले विनोदाचे फटाके… कोल्हारच्या कार्यक्रमात उमटले हास्य फवारे…

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात विनोदी शैलीत मोजक्या आणि मार्मिक शब्दात कोपरखळ्या मारल्या. यातून त्यांनी दिवाळीपूर्वीच विनोदाचे फटाके फोडल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. औचित्य होते शिर्डी मतदार संघातील कोल्हार भगवतीपूर येथे प्रत्येक कुटुंबाला दिवाळीनिमित्त पाच किलो साखर वाटपाच्या कार्यक्रमाचे…

दोन्ही गावांचे स्वतंत्र कार्यक्रम झाले. कोल्हार बुद्रुकचे साखर वाटप दीपक मंगल कार्यालयात तर भगवतीपूरचे साखर वाटप भगवती माता मंदिराच्या प्रांगणात झाले.

स्थानिक आयोजकांनी कार्यक्रमाची वेळ दुपारी २ वाजेची दिल्याने ग्रामस्थ व कार्यकर्ते त्यावेळी हजर झाले. मात्र खा. डॉ. सुजय विखे पाटील ४ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच डॉ. विखे यांनी विनोदाची कोटी करत म्हणाले, मी कोल्हार भगवतीपूरच्या कार्यक्रमाची ४ वाजेची वेळ दिली होती. परंतु स्थानिकांना ३ वाजेची वेळ वाटली असावी. त्यांनी ग्रामस्थांना आणखी एक तास अगोदर म्हणजे २ वाजेची वेळ सांगितली. मात्र इथे तर ग्रामस्थ १२ वाजेपासूनच हजर होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कार्यक्रमाच्या इतक्या लवकर उपस्थिती कधी पाहिली नव्हती असे म्हणतात मोठा हशा झाला. त्यामुळे भाषणाच्या सुरुवातीपासूनच हास्य फवारे उमटू लागले.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, महिलांसाठी आपण पंढरपूर – तुळजापूर देवदर्शन यात्रा घडविल्या. मग पुरुषांना काही नको का ? असे म्हणत त्यांच्यासाठी येत्या २ महिन्यात यात्रा काढू. कार्यकर्त्यांनी फक्त याद्या तयार कराव्या. पुरुषांना कोठे न्यायचे ते मला चांगले माहिती आहे. असे म्हणताच सभामंडपात मोठमोठ्या हास्यलकेरी पसरल्या. यापुढे ते म्हणाले, गावात काही मोजके उपद्रवी लोक आहेत. त्यांचा समाजाला काही उपयोग नाही. ते गावात सकाळपासून पुड्या सोडतात. उगीचच कुणालाही बोट लावतात. त्यांना या यात्रेत आवर्जून घ्या. त्यांना तिकडेच लांब सोडून यायचे आहे. त्यांना वर्षभर तरी तिकडेच ठेवायचे. त्यांचा काय खर्च होईल तो मी करेन. त्यांना मी दिलेली साखर कडू लागणार असल्याचे म्हणून संपूर्ण भाषणात आपल्या विनोदी शैलीत उपस्थितांना प्रचंड हसविले.

मुस्लिम महिलांसाठी अजमेर यात्रा…

आपल्या भाषणात खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, श्रावण महिन्यात महिलांसाठी पंढरपूर – तुळजापूर देवदर्शनाचा उपक्रम यशस्वी केला. आता लवकरच मुस्लिम महिलांसाठी अजमेरची यात्रा काढू. आपल्या मतदार संघातील जनतेने कधीही पक्ष व चिन्ह पाहिले नाही. फक्त विखे पाटील परिवार नजरेसमोर ठेवून भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!