spot_img
spot_img

जगाच्‍या स्‍पर्धेत अपेक्षित असलेल्‍या गुणवत्‍तापूर्ण शिक्षणा बरोबरच संशोधनाच्‍या संधी निर्माण करुन मार्गक्रमण करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामीण भागातील पहिले खाजगी महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाची ओळख

लोणी,दि.९( जनता आवाज वृत्तसेवा ):-नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजाणीत कौशल्‍य विकासालाच प्राधान्‍य दिले गेले आहे. शिक्षण क्षेत्राची परिभाषाही आता बदलली आहे. यासर्व गोष्‍टींचा विचार करुन, जगाच्‍या स्‍पर्धेत अपेक्षित असलेल्‍या गुणवत्‍तापूर्ण शिक्षणा बरोबरच संशोधनाच्‍या संधी निर्माण करुन, आता मार्गक्रमण करावे लागेल अशी अपेक्षा महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाच विभागांचे एनबीए मानांकन यशस्‍वीपणे पूर्ण केल्‍याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत महाविद्यालयाने आनदोत्‍सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, संस्‍थेचे जेष्‍ठ संचालक आण्‍णासाहेब भोसले, भाऊसाहेब ज-हाड, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन कैलास तांबे, दत्‍ता शिरसाठ, संजय जोशी, दादासाहेब घोगरे, स्‍वप्‍नील निबे, आप्‍पासाहेब दिघे, पोपटराव वाणी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मयुर दाते, भाऊसाहेब कोलाटे, संस्‍थेचे उपमुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.एस.एन हिरेमठ, प्राचार्य डॉ.गुल्‍हाणे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील पहिले खासगी महाविद्यालय म्‍हणून या महाविद्यालयाची ओळख आहे. आज विविध विद्या शाखांच्‍या माध्‍यमातून असंख्‍य विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. काळाच्‍या ओघात जगामध्‍ये अपेक्षित असलेल्‍या शिक्षण व्‍यवस्‍था निर्माण करुन, विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे. परंतू आज महाविद्यालये जर परिपुर्ण असतील तरच विद्यार्थी प्रवेश घेण्‍यासाठी आकर्षित होतील. एनबीए मानांकन ही फार मोठी उपलब्‍धी आता महाविद्यालयाने पुर्ण केली असून, यामुळे महाविद्यालयाचा भविष्‍यकाळ उज्‍ज्‍वल होईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

प्रवरा मेडीकल ट्रस्‍टमध्‍ये झालेल्‍या आरोग्‍य परिषदेमध्‍ये तयार करण्‍यात आलेला मसुदा हाच पुढे देशाच्‍या राष्‍ट्रीय आरोग्‍य अभि‍यानाचा भाग बनला. खासदार साहेबांनी नेहमीच कौशल्‍य विकासाचे धोरण राबविले जाण्‍यासाठी प्रयत्‍न केले आज त्‍याचा अंतर्भाव नव्‍या शैक्षणिक धोरणात झाला आहे. याचा विचार करुन, आपल्‍या भागात सुरु होणा-या प्रत्‍येक संकल्‍पना या महत्‍वपूर्ण असल्‍याकडे त्‍यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

कोव्‍हीड संकटाने ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम हे पर्याय आपल्‍याला दिले. कारण जगातील शिक्षणाची परिभाषाच आता बदलत चालली आहे. प्रत्‍येक महाविद्यालयाचे वेगळेपण आता पाहीले जाणार आहे. गुणवत्‍तेचा आलेख तुम्‍ही कसा उंचावता यावरच तुमची प्रवेश प्रक्रीया अवलंबून असणार आहे. येणा-या विद्यार्थ्‍याला स्‍पर्धेचा अपेक्षित असलेले शिक्षण उपलब्‍ध करुन देणे ही सर्वांची सामु‍हिक जबाबदार असल्‍याने या शिक्षणा बरोबरच आता संशोधनाच्‍या संधीही महाविद्यालयातील प्रत्‍येक विद्याशाखेने निर्माण करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली. यासाठी उदिष्‍ठ ठेवून काम झाले तर, आपले महाविद्यालय संशोधन क्षेत्राचे केंद्र म्‍हणून निश्चित विकसीत होईल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले की, या संस्‍थाची निर्मितीच गुणवत्‍तेच्‍या आधारावर झाली आहे. संस्‍थेच्‍या विकासासाठी खासदार साहेब सातत्‍याने पाठपुरावा करायचे. बदलते प्रवाह आपल्‍या संस्‍थेमध्‍ये कसे येतील यासाठी त्‍यांनी केलेले प्रयत्‍न आज आपल्‍याला यशापर्यंत घेवून जाताना दिसत आहेत. प्राचार्य डॉ.गुल्‍हाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. एनबीए मानांकन प्राप्‍त केलेल्‍या विभाग प्रमुखांचा तसेच यासाठी योगदान देणा-या प्राध्‍यापकांचा मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!