टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आज गुरूवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून लाखोंच्या संख्येने उपस्थित समाज बांधवाना ते आरक्षणा बाबत संबोधीत करत आहे. काल बुधवारी संध्याकाळी जरांगे पाटील यांची श्रीरामपूर नगरीत प्रचंड मोठी सभा पार पडली. तद्नंतर ते आज नेवासा येथे सभेसाठी जात असतांना त्यांचे ठिकठिकानी स्वागत करण्यात आले.
टाकळीभान येथेही आज जरांगे पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांची आतीषबाजी व ढोलताश्यांच्या निनादात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले. सकल मराठा आरक्षण समितीच्या वतीने त्यांना व त्यांच्या सहकार्यांना तसेच ग्रामस्थांना कार्तिकी एकादशी निमित्ताने फराळ देण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.टाकळीभान येथील मराठा समाजबांधव व समस्त ग्रामस्थांचा उत्साह पाहून ते भारावून गेले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच टाकळीभान येथेही एक सभा घेण्याचा मानस जरांगे पाटील यांनी व्यक्त करून २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणारे अधिवेशन रद्द करून ते २९ नोव्हेंबरला घेण्याचे सरकारकडून सांगण्यात येत असून ज्या अर्थी अधिवेशन पुढे ढकलले त्या अर्थी त्या अधिवेशनात नक्कीच आरक्षणाबाबत निर्णय होण्याची चिन्हे असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले.
यावेळी उपस्थित टाकळीभान येथील ग्रामस्थ मराठा समाज बांधव राजकीय लोकांची वाट बघत नाही. इतक्या आतूरतेने मनोज जरांगे पाटील यांची येण्याची वाट बघत असल्याचे दिसून आले. सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



