21.8 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत जिल्हा राज्यात अव्वल-ना.विखे पाटील १०४ उद्योगांना मंजूरी,७००व्यक्तींना रोजगार,

शिर्डी दि.२७ ( जनता आवाज
वृत्तसेवा ) -जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला गती देण्यात आली असून,युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून चालू वर्षात १०४ उद्योगांना मंजुरी मिळाली असून ७०० बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती जिल्हा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
   अहमदनगर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येऊन त्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन जिल्हयातील सर्व बँकांच्या तसेच सर्व संबंधित विभाग प्रमुखाच्या बैठका घेत बँकांना उद्योगासाठी अधिक प्रमाणात कर्ज मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत सातत्याने पाठपुरावाही करण्यात आल्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
   जिल्ह्यातील युवक,युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येऊन बँकेच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत कर्ज वितरण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या १०४ उद्योगांना ४.७३ कोटी इतके अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात सुमारे २५ कोटी इतकी औ‌द्योगिक गुंतवणुक होत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून जिल्हयासाठी असणारे एक हजार उद्योगांचे उद्दिष्ट साध्य होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
   
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातुन जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणा व बँकांनी अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.
नगर जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उद्योग क्षेत्रांत अधिकची गुंतवणूक कशी होईल असा प्रयत्न असून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून औद्योगिक विकासाच्या कामाला गती मिळत असल्याचे समाधान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!