लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात आयोजित करण्यात आलेल्या “सेल्फि विथ मेरी माटी मेरा देश” या उपक्रमात विशेष योगदान दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला असून संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचाही सन्मान कृतज्ञता सोहळ्यात करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्याचे आव्हान केले होते. याच पार्श्वभूमीवर सेल्फि विथ मेरी माटी मेरा देश याचीही जोड या उपक्रमास देण्यात आली. महसूल मंत्री तथा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आपल्या प्राथमिक, माध्यमिक आणि व्यावसायिक विद्यालयाच्या माध्यमातून सेल्फि विथ मेरी माटी मेरा देश हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. विश्वविक्रमी नोंद होण्यासाठी संस्थेने या उपक्रमात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या सेल्फिंचे महत्वपूर्ण योगदान दिले. यासर्व संकलित झालेल्या सेल्फि विश्वविक्रमासाठी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. तसेच शिर्डी मतदार संघात यासाठी विशेष रथ फिरवून संकलित करण्यात आलेल्या मातीचा कलश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी दौऱ्यामध्ये सुपूर्त केला होता.
या राष्ट्रीय उपक्रमात योगदान दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीत संस्थेला मानचिन्ह आणि सन्मानत्र देवून गौरविण्यात आले. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचाही विशेष सन्मान करण्यात आला आहे. संस्थेच्यावतीने विभागप्रमुख डॉ.संजय कुरकुटे यांनी या सन्मानाचा स्विकार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेना प्रतिसाद म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने झालेल्या विश्वविक्रमात संस्थेला योगदान देता आले याचा निश्चितच अभिमान असल्याची प्रतिक्रीया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या झालेल्या विशेष गौरवाबद्दल माजी आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जि.प.माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे मुख्यकार्य.अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ.प्रदीप दिघे, संचालिक सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डॉ.एम.एम.गुलाणे, प्राचार्य डॉ.विजय राठी यांनी अभिनंदन केले आहे.



