कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार भगवतीपूर येथील पोलीस दुरुक्षेत्रामध्ये आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईदला त्यादिवशी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय घेतला.
आषाढी एकादशी हा हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी हिंदू बांधव आवर्जून उपवास करतात. याच दिवशी बकरी ईद असल्याकारणाने हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करीत या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय कोल्हार भगवतीपूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला.
लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले, दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने गावात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये. जातीय तणाव होऊ नये. शांततेत सर्व उत्सव – सण साजरे व्हावेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या जातीवाचक मेसेजमुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ देऊ नये. वादविवाद, भांडणे यातून कुणाचेही भले झाले नाही नसल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे यांनी मुस्लिम बांधवांना त्यादिवशी कुर्बानी देऊ नका. काही गावांनी हा निर्णय घेतला आहे. आपणही आदर्श घालून द्यावा असे नम्र आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत असीर पठाण, हमीद शेख, आसिफ शेख यांनी आम्ही पूर्वीपासूनच सर्व धर्मीयांच्या सणांचा आदर करत आलो आहोत. त्यामुळे आम्ही कोल्हार भगवतीपूरमध्ये एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले.
पत्रकार संजय कोळसे म्हणाले, पोलीस दप्तरी कोल्हार भगवतीपूर गावाची संवेदनशील म्हणून नोंद आहे. मात्र या गावातील सर्व धर्मीय पूर्वीपासून एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सणांना उत्सवांमध्ये आनंदाने सहभागी होत असल्याची परंपरा आहे. गावात जे काही भांडण तंटा होतात, ते व्यक्तिगत स्वरूपाचे असतात मात्र काही उपद्रवी मूल्य त्यास जातीय रंग देतात. अन्यथा या गावात सर्वजण एकमेकांना सहकार्याचीच भूमिका ठेवत आल्याचा इतिहास आहे.
याप्रसंगी सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे, पोलिस नाईक संभाजी कुसळकर, दिलीप बोरुडे, धनंजय लोखंडे तसेच हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते.