कोल्हार ( जनता आवाज
वृत्तसेवा ) :– कोल्हारमध्ये आठ लाखांची घरफोडी झाल्यानंतर आ बाळासाहेब थोरात यांनी जितेंद्र खर्डे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांना गावात झालेल्या चोऱ्यांचा तपास व्हावा व कोल्हारच्या वीज उपकेंद्राच्या मंजुरीबाबत निवेदन देण्यात आले.
सुसंवाद मंच व समस्त कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले की, गावात होणाऱ्या चोरीच्या घटना व गावगुंडांचा उपद्रव वाढत आहे.त्यावर पोलीस प्रशासनाने अंकुश ठेवून गुन्हेगारांवर जरब बसवावी. तसेच कोल्हार पोलिस चौकीला आणखी पोलीसबळ वाढवावे. यानंतरही असेच सुरू राहिल्यास रास्तारोको व बेमुदत गांव बंद पुकारण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोल्हार भगवतीपुर मध्ये नवीन वीज उपकेंद्राला मंजुरी मिळाली. त्यासाठी राजुरी रस्त्यालगत दोन एकर जागा दिली आहे. दरम्यानच्या काळात यासाठी साडेचार कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र यासंदर्भात कुठलेही काम सुरू झालेले नाही. कोल्हार साठी स्वतंत्र वीज उपकेंद्र होऊन विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत आशा आशयाचे निवेदन यावेळी आ बाळासाहेब थोरात यांनी देण्यात आले.