श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ): –बीड – मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि श्रीगोंदा नगर पालिका हद्दीतील मुख्य चौकातील बेकायदा होर्डिंग्ज वर कारवाई करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामजिक कार्यकर्त्या तथा श्रीगोंदा प्रेस क्लबच्या सरचिटणीस श्रीमती मीरा शिंदे यांनी गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर पासून येथील नगर पालिका समोर उपोषणास प्रारंभ केला असून दुपारी काही होर्डिंग्ज काढण्यास सुरूवात झाल्याचे दिसते.
उपोषणार्थी शिंदे म्हणाल्या बेकायदा होर्डिंग्ज मुळे वाहतुकीला अडचण होते. वाहतूकोंडीमुळे अपघात घडतात त्यामूळे होर्डींग्ज वर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला याचे नियम आदीबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष केल्याने उपोषणाचा इशारा दिला. बेकायदा होर्डिंग्ज बाबत स्पष्ट सूचना असताना पालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याचा पुनरुच्चार करून कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले
दरम्यान मुख्याधिकारी ढोरजकर यांनी भेट देऊन कारवाई बाबत आश्वासन दिले मात्र कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे मीरा शिंदे यांनी सांगितले.
उपोषणास तालुक्यातील पत्रकार संघटना आणि प्रेस क्लबच्या वतीने पाठिंबा दिला आहे.तसेच संभाजी ब्रिगेड, बजरंग दल, लहुजी शक्ती सेना यांनी देखील पाठिंबा दिला.
पालिकेने होर्डिंग्ज उभारणाऱ्या लोकांना नोटीस दिल्या असून ३दिवसांत स्वतः हुन होर्डिंग्ज न काढल्यास पालिका होर्डिंग्ज काढून त्याचा खर्च जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून किंवा मालमत्ता कर मध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे
उपोषण सुरू होताच काहींनी स्वतः हुन होर्डिंग्ज काढण्यास सुरूवात केल्याचे दिसले