संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-शासन आपल्या दारी उपक्रमात दाखल झालेल्या वैयक्तीक लाभ योजनेच्या अर्जांना पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, विविध योजनांच्या २१० लाभार्थ्यांना ३ लाख १५ रुपयांचा लाभ मंजूर झाला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्यनिवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनांचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थींनी अर्ज दिले होते. याबाबत त्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन संबंधित लाभार्थींना तातडीने योजनांचा लाभ देण्याचा सुचना मंत्री विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या होत्या.
या अर्जांवर प्रशासकीय स्तरावर झालेल्या कार्यवाहीनंतर तालुक्यातील सुमारे २१० लाभार्थ्यांना या योजनांचे अनुदान मंजूर झाले असून, लवकरच ते लाभार्थ्यांच्या खात्यावरही जमा होणार आहे. यामध्ये ९१ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, ४७ लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन, ६१ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना तसेच ९ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे अनुदान तसेच २ लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटूंब योजनेचा लाभ मंजूर झाला आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनाही लवकरच योजना मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यामध्ये मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी उपक्रम सुरु झाल्यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे अधिक सुखकर झाले आहे. योजनेपासून वंचित राहाणाऱ्या लाभार्थ्यांनाही कागदपत्रं सादर करणे सोयिस्कर झाल्याने सर्वच तालुक्यांमध्ये शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.