लोणी, दि.४( जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचारांचा खर्च महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या असून, जखमींच्या उपचारांची सर्व माहीती मंत्र्यांनी डॉक्टरांकडून जाणून घेतली.
विश्वसंत साईबाबा पालखीला संगमनेर तालुक्यातील माउली घाटानजीक अपघात झाला. राहाता तालुक्यातील कनकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे, को-हाळे येथील ताराबाई गमे, शिर्डी येथील बबन थोरे आणि कोपरगावचे बाबासाहेब गवळी या चार वारक-यांचा मृत्यू झाला. अन्य काही वारक-यांना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी सर्व जखमी व्यक्तींवर तातडीने आवश्यक उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह स्थानिक अधिकारी रुग्णालयात थांबून होते. मंत्री विखे पाटील यांनीही उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली.
जखमी रुग्णांचे सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रीपोर्ट प्राप्त झाल्यानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू असून आजही मंत्री विखे पाटील यांनी जखमीच्या उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली. या सर्व रुग्णांवर कोणताही अर्थिक भार येवू देवू नका, उपचारांचा सर्व खर्च मंत्री विखे पाटील यांनी करण्याची जबाबदारी घेवून जखमी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही या व्यक्तींना मदत होण्यासाठी सर्वाचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत त्यांनी प्रशासनास सुचना दिल्या असून त्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पुणे महमार्गावरून आळंदीकडे जणाऱ्या सर्व दिड्याची संख्या लक्षात घेवून या मार्गावर वातुकीचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.