संगमनेर, दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी यात्रेसाठी जिल्ह्यातून जाणा-या सर्व दिंड्याचे नियोजनही भविष्यात करावे लागेल. तशा सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी येथून आळंदी वारीसाठी निघालेल्या वारक-यांना माउली घाटात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची मंत्री विखे पाटील यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांचीही माहीती त्यांनी डॉक्टरांकडून जाणून घेतली. सुरु उपचारां बद्दल समाधान व्यक्त करुन, पुढील काही उपचारांसाठी रुग्णांना बाहेरच्या हॉस्पीटलमध्ये जाण्याबद्दलही त्यांनी रुग्णांशी चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंदे, तहसिलदार धिरज मांजरे, उपविभागी पोलिस आधिकारी सोमनाथ वाकचौरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक रुग्णाजवळ जाणून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, वारक-यांच्या अपघाची घटना अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या वारक-यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. जखमी झालेल्या सर्व रुग्णांचा खर्च करण्याची जबाबदारी व्यक्तिश: मी घेतली आहे. अन्यही काही उपचारांसाठी खर्च करावा लागला तरी या कुटूंबियांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुर्वी नगर जिल्ह्यातून आषाडी वारीसाठी पंढरपुरला जाणा-या सर्व दिंड्याची माहीती संकलित करुन, त्या दिंड्याच्या प्रवासासाठी सर्व यंत्रणा सज्ज केल्या होत्या. या नियोजनाचा वारकरी सांप्रदायाला मोठा दिलासा मिळाला होता. त्याच धर्तीवर आता कार्तिकी वारीसाठी नगर जिल्ह्यातून जाणा-या दिंड्यांचेही नियोजन भविष्यात करावे लागेल. तशा सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.