लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा उद्योग समुह आणि ब्रह्माकुमारी लोणी यांच्या वतीने शुक्रवार दि. १५ डिसेबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या ब्रम्हाकुमारी शिवानी दिदि यांचे जीवन परिवर्तन करणारे नाते आणि संबंध यातील मधुरता याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
ब्रह्माकुमारी शिवानी दीदी या राजयोग मेडिटेशनच्या जगप्रसिद्ध अभ्यासिका आणि शिक्षिका आहेत. या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत जगभरातल्या लाखो लोकांचे जीवनमान समृद्ध केले आहे. त्यांनी लोकांना आपले जीवन व जीवनातील व्यवहार, स्वतःच्या जीवनाचे व्यवस्थापन, कामाचे व्यवस्थापन आणि आपले जीवन मूल्य याविषयी जागृत केले आहे. आधुनिक जीवनशैली मध्ये, अध्यात्म विषयी बोलणान्यांपैकी त्या एक आहेत.मार्च २०१९ मध्ये, भारताचे माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, मानवी वर्तनात बदल घडविण्याच्या त्यांच्या भूमिकेसाठी, भारतातील महिलांसाठी चा सर्वोच्च नागरिक सन्मान नारीशक्ती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. २०१७ मध्ये त्यांची जागतिक मानसोपचार संघटनेने सदभावना दूत (गुडविल अंबेसिडर) म्हणून नियुक्ती केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांच्या मुख्यालयात त्यांची अनेक सत्रे आयोजित केली गेली आहेत.
आध्यात्मिक चेतना सशक्त करण्यात त्यांच्या उत्कृष्टतेसाठी २०१४ मध्ये, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया लेडीज लीग द्वारे त्यांना दशकातील यशवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा स्वपरिवर्तनाचा उद्देश असलेला लोकप्रिय टेलिव्हिजन शो अवेकनिंग विथ ब्रह्माकुमारी याने २००० भाग पूर्ण करण्याचा दुर्मिळ गौरव मिळवला. एका दशकाहून अधिक काळ या कार्यक्रमाने भारत, यूएसए, कॅनडा, युके, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मध्यपूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींना सक्षम केले आहे. दर्शकांनी त्यांच्या भावनांची वयक्तिक जबाबदारी स्वीकारून मानसिक तणाव, नैराश्य, व्यसने यावर मात केली आहे.
लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्यासह जिल्हातील विविध मान्यवर आणि ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.