लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):- संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुकचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा मंगळवारपासून आरंभ होत असून ती आठवडाभर चालणार आहे.
नवसाला पावणारा लोणीचा म्हसोबा म्हसोबा म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवताची मंगळवार दि.२६ डिसेंम्बर पासून यात्रा आरंभ होणार आहे.ग्रामस्थ व यात्रा कमिटीने यात्रेचे चोख नियोजन केले असून राज्यातील आणि राज्याबाहेरील दुकानदारांनी दरवर्षी प्रमाणे आपली दुकाने थाटली आहेत. म्हसोबा महाराज मंदिराबरोबरच गावातील सर्व देवतांच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीआहे.भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी दत्त जयंतीला यात्रा आरंभ होणार आहे.सकाळी ७ वा.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते म्हसोबा महाराज मूर्तीला अभिषेक करण्यात येईल.त्यानंतर दुपारी ४ वा.म्हसोबा महाराजांची ५० फूट उंचीच्या काठीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल.यावेळी ना.विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील या मान्यवरांसह ग्रामस्थ,भाविक उपस्थित राहणार आहेत.रात्रौ ९ वा.बाजारतळ येथे हरिभाऊ बढे यांची नात शिवकन्या बढे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
बुधवारी दुपारी २ वा.रंगारी मैदानावर जंगी कुस्त्यांची दंगल रंगणार आहे.यावर्षी महिला कुस्तीगीर मोठ्या संख्येने येणार असल्याने कुस्ती शौकिनांना मोठी पर्वणी ठरणार आहे.गुरुवारी सकाळी ११ वा.लोणी-तळेगाव रस्त्यावर गोगलगाव येथील राज गॅरेजच्या मागील भव्य मैदानावर बैलगाडा शर्यत होणार असून राज्याच्या अनेक भागातून स्पर्धक त्यात सहभागी होणार आहेत.
उंच गगनाला भिडणारे पाळणे,ब्रेक डान्स,मौत का कुवा,तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पाळणे यात्रेचे महत्वाचे आकर्षण ठरत आहे.मिठाईची दुकाने,खेळण्या,महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने,प्रसाद आणि पानफुल व विविध वस्तूंच्या दुकानांनी लोणीचे सर्व रस्ते गजबजून गेले आहेत. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता,पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व गोष्टी उपलब्ध केल्या असून भाविकांनी यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन व मनोरंजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.