बीड( जनता आवाज वृत्तसेवा):- बीड जिल्ह्यामधील भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सहकाराचा एक वेगळा पॅटर्न सादर केला आहे. या नेत्यांनी परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध केल्या आहेत.
त्यात कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा, तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाच्या चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन नेते हा कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एकत्र आल्याचे स्पष्ट होत आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी सकाळी 11 वा. विशेष बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी पंकजा मुंडे यांचा एकमताने अर्ज आल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे गटाच्या चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे 11 उमेदवार, तर धनंजय मुंडे गटाचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
या बैठकीवेळी कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. या घटनाक्रमामुळे मुंडे बंधू – भगिणीमधील वाद निवळल्याचेही चित्र आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच सामना रंगत आला होता. पण या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हा कारखाना आपल्या ताब्यात ठेवला.
धनंजय मुंडे यांनी पंकजांसाठी एक पाऊल मागे घेतल्याचेही चित्र आहे. दरम्यान, वैद्यनाथ साखर कारखान्यावर गत अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. आता पुन्हा हा कारखाना त्यांच्याच ताब्यात राहणार आहे. भाऊ आणि बहिणी मध्ये असलेले वाद मिटल्यामुळे पुढील काळामध्ये बीड करांना आपले दोन्ही नेते एक व्हावे. ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे.