लोणी, दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण लोणी खुर्द गावामध्ये महिलांना अक्षता देवून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी ११ महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात निमंत्रण दिले आहे.
लोणी खुर्द गावात मी सेवक साईंचा हा संदेश घेवून दरवर्षीच श्री.साईचरित्र पारायण सोहळा तसेच श्रीराम कथेचे आयोजन केले जाते. सलग १५ वर्षे हा धार्मिक उपक्रम ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला जातो. आयोध्येतील श्रीरामचंद्राच्या मंदिरात मुर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द गावातील या उपक्रमास विशेष महत्व आहे.
या कार्यक्रमामध्येच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी महिलांना आयोध्येतील कार्यक्रमाचे अक्षता देवून निमंत्रण दिले. त्या दिवशी सर्व समाज बांधवांनी घरावर गुढ्या उभाराव्यात तसेच रांगोळ्या आणि दिवे लावून या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले. लोणी खुर्द येथील साई सदिच्छा गृपने आयोजित केलेला हा साई चरित्र पारायण सोहळा निश्चितच आध्यात्मिक आनंद देणारा आहे. सलग १५ वर्षांची परंपरा राखुन या गावातील युवकांनी संस्काराचे आणि हिंदु धर्माच्या संस्कृती परंपरेला पुढे घेवून जाण्यासाठी सुरु ठेवलेले काम हे खुप मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
साई सदिच्छा गृपच्या वतीने यावर्षी ७ दिवसांचा साईचरित्र पारायण सोहळा तसेच ह.भ.प सोनाली दिदि कर्पे यांच्या राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी आणि ग्रामस्थांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. साईरामाच्या जयघोषाने या आध्यात्मिक उपक्रमाची सांगता झाली.