श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):-२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले.
त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.
22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे. आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.