लोणी दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रत्येक विद्यार्थी शालेय वातावरणाबरोबरच त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमधून, अनुभवांतून शिकत असतो. मग हेच विचार त्याच्या लेखणीतून कागदावर अवतीर्ण होतात. या बदलणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीत प्रवरा मंथन या नियतकालीकासारखे शालेय उपक्रम अपरिहार्य झाले आहेत असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे झालेल्या लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेल्या आझादी का अमृतमहोत्सव अशी संकल्पना असलेल्या प्रवरा मंथन या नियतकालिकाच्या साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना सौ. शालिनीताई म्हणाल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणे व त्यांच्यातील विविध कलागुणांची वाढ करण्यासाठी नामदार श्री. राधाकृष्ण विखे पा. यांच्या संकल्पनेनुसार संस्थेच्या सर्व शाखांतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्यातील साहित्यिक प्रतिभेस चालना मिळावी या हेतूने हाती घेतलेला प्रवरा मंथन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. संस्था अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्याना नेहमी प्रोत्साहित करते ही आनंदाची गोष्ट आहे असेही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.
प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी खु च्या साक्षी अशोक बर्गे हिने काळ आला होता पण… या कथेसाठी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालय लोणी बु च्या गायत्री भीमबहादूर क्षत्रिय हिला देश मेरा महान या कवितेसाठी सर्वोत्कृष्ट कवितेचा पुरस्कार मिळाला. महात्मा फुले विद्यालय दाढ बु च्या श्रद्धा खंडागळे हिने एका क्रांतिकारकाचे मनोगत या लेखासाठी सर्वोत्कृष्ट लेख व भगवतीमाता विद्या मंदिर, भगवतीपूरच्या नवाझ अंनिस शेख याने डिजिटल इंडिया या चित्राकृतीसाठी सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार मिळविला.
या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका तथा प्रवरा मंथनच्या मुख्य संपादिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक प्रा. नंदकुमार दळे, प्राचार्या सौ. भारती कुमकर, कार्यकारी संपादक प्रा. गिरीश सोनार, सहयोगी संपादक श्रीमती भारती देशमुख, प्रा. दीपक डेंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते. सौ. विद्या घोरपडे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.