म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- डिपीचा जम्प जोडला नाही म्हणुन महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराला चार जणांनी मिळुन लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील म्हैसगाव येथे दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी घडलीय.
नानाभाऊ बाजीराव आंबेकर, वय ३२ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील म्हैसगाव येथे राहत असून ते चार वर्षापासुन महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे ताहाराबाद सब स्टेशन येथे कंत्राटी कर्मचारी म्हणुन नोकरीस आहेत. ताहराबाद सब स्टेशन अंतर्गत शेरी चिखलठाण, दरडगाव थडी हे गावे येत असुन त्या ठिकाणी विद्युत लाईन दुरुस्ती करणे व वीज बिल वसुली करण्याचे काम नानाभाऊ आंबेकर हे करतात. दि. १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी आरोपी हर्षद भाउसाहेब बाचकर याने नानाभाऊ आंबेकर यांना फोन करून दरडगाव येथील दोंदे डी. पी. चा जम्प तुटलेला आहे, तुम्ही तो जम्प जोडुन दया, असे सांगीतले. तेव्हा नानाभाऊ आंबेकर त्यास म्हणाले कि, मी राहुरी फॅक्टरी येथे मिटींगसाठी जाणार आहे. मिटींग वरुन आल्यानंतर दुपारी जम्प जोडुन देतो. त्यानंतर दुपारी ३ वाजे दरम्यान नानाभाऊ आंबेकर हे मिटींग करुन दरडगाव थडी येथे मोटार सायकलवर जात असतांना म्हैसगाव ते ताहाराबाद रोड वरील दरडगाव फाटा येथील चौकात आरोपींनी आंबेकर यांची मोटारसायकल थांबविली. आणि डी.पी. चा जम्प जोडला नाही म्हणुन शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी आंबेकर यांना दोंदे डी.पी. कडे घेवुन जावुन त्यांच्या कडुन जम्प जोडुन घेतला. तसेच तु जर आमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवे मारुन टाकु, अशी धमकी दिली.
घटनेनंतर नानाभाऊ बाजीराव आंबेकर यांच्यासह महावितरण च्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नानाभाऊ आंबेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी हर्षद भाउसाहेब बाचकर, रा. दरडगाव थडी, ता. राहुरी. आणि इतर तीन अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. ४५/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.